दीपक पाटकर यांची तत्परता ; मालवणात बांधकाम कामगारांचा महत्वाचा प्रश्न मार्गी
मालवण : मालवण नगरपालिकेकडील बांधकाम अभियंता हे पद रिक्त असल्याने शहरातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालिकेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या पदाचा कार्यभार अवेक्षक सुधाकर पाटकर यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला आहे.
मालवण शहरात अनेक बांधकाम कामगार कार्यरत असून त्यांच्या परवान्याची मुदत संपल्याने बांधकाम अभियंत्याच्या रिक्त पदामुळे या कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तसेच माजी खासदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे देखील याकडे लक्ष वेधले होते.
परिणामी बांधकाम कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेचे अवेक्षक सुधाकर पाटकर यांच्याकडे बांधकाम अभियंता पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत. तर शहरातील बांधकाम कामगारांच्या महत्वाच्या समस्येची दखल घेऊन तोडगा काढल्या बद्दल श्री. पाटकर यांनी माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे, अवेक्षक सुधाकर पाटकर, पालिका अधिकारी महेश परब यांचे आभार मानले आहेत.