देशाच्या अर्थव्यवस्थेने पकडलेली गती कायम ठेवणारा, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षात पकडलेली गती कायम ठेवत वित्तीय तुट कमी करण्यात सरकारला आलेले यश ही आजच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झालेली महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होणार असून अर्थव्यवस्थेचे चक्र असेच गतिमान राहणार आहे असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेल्या देशाच्या अर्थसंकल्पावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था रुळावर आली आणि तिने गती पकडली. यंदा निवडणुकीचे वर्ष असतानाची ती गती अशीच कायम राहणार आहे हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वित्तीय तुट ५.९ टक्के वरून ५.८ टक्केवर आणण्यात सरकारला यश आले आहे. म्हणजे ही वित्तीय तुट ०.१ ने कमी झाली आहे. तर पुढील वर्षासाठी ही तुट ५.१ टक्केवर आणणे प्रस्तावित करण्यात आली आहे. म्हणजेच ही वित्तीय तुट ०.७ टक्क्याने कमी होणार आहे. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत अशी तुट भरून काढणे हे नेहमीच जिकरीचे असते तर भारतासारख्या बहुभाषीय, बहुप्रांतीय, बहुसंख्यीय देशामध्ये तर ते अनेकदा अशक्यप्राय दिसून येते. पण ही अशक्य गोष्ट शक्य करण्यात सरकार आणि अर्थ मंत्रालयाला यश आले असून येणाऱ्या काळात ती ०.७ टक्केने कमी होणार असल्याने देशाच्या उद्योग क्षेत्र, बँकिंग, शेअर मार्केटसह गुंतवणुकीच्या विविध क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे.
बजेट देशाचे असो वा व्यवसायाचे त्यातील तुट भरून काढणे हे निश्चितच महत्वाचे असते. त्यावर संपूर्ण अर्थकारण अवलंबून असते. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आलेले यश हे अभिनंदनीय असून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाचे आहे. या यशामुळे आर्थिक क्षेत्रातील विविध घटकांवर त्याचा खोलवर परिणाम होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे हे चक्र वेगाने फिरून अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.