केवळ बँकिंग व्यवहार न करता व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र राजापूर अर्बन बँकेने सुरु करावे…

माजी आमदार प्रमोद जठार यांचे प्रतिपादन ; १०२ वर्षांचा इतिहास असलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या मालवण शाखेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न

सावकारी कर्जाचा विळखा पडलेल्या ठिकाणी सुरु होणाऱ्या राजापूर अर्बन बँकेसारख्या बँकेचे स्वागत करणे प्रत्येकाचे कर्तव्य : नितीन वाळके

मालवणवासियांनी बँकेशी व्यवहार करावेत आम्ही कोणत्याही ठिकाणी कमी पडणार नाही ; बँकेचे अध्यक्ष हनिफभाई काझी यांची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. १०२ वर्षांची परंपरा असलेली राजापूर अर्बन बँक आजपासून मालवणात कार्यरत झाली आहे. आज बँकिंग फास्ट झाले असून बँकिंग व्यवहार पण बदलेलेले आहेत. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेने नुसते क्रेडिट आणि डेबिट हे विषय न करता बँकेत लोकांना रोजगाराचे प्रशिक्षण देखील द्यायला पाहिजे. उत्तम व्यवहार कसा करायचा, उत्तम रोजगार कसा करायचा, उत्तम व्यवसाय कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र बँकेने आपल्या सर्व शाखांमध्ये सुरु करावे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर अर्बन बँकेच्या मालवण शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. 

दरम्यान, कोरोनानंतर येथील बाजारपेठ मंदावली असून अनेक व्यापाऱ्यांना सावकारी कर्जाचा विळखा पडला आहे. अशावेळी मालवण मध्ये सुरु होणाऱ्या राजापूर अर्बन बँकेसारख्या बँकेचे स्वागत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी सांगितले. तर ४० सभासदांच्या जोरावर सुरु झालेल्या या क्रेडिट सोसायटीचे १०२ वर्षात पतसंस्था आणि बँकेत रूपांतरण झाले आहे. बँकेची १३ वी शाखा आज सुरु झाली असून बँकेचा व्यवसाय ७०० कोटींपर्यंत पोहोचला आहे. मालवणवासियांनी आमच्या बँकेशी व्यवहार करावेत. आम्ही कोणत्याही ठिकाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष हनिफभाई काझी यांनी यावेळी बोलताना दिली.

१०२ वर्षांची यशस्वी वाटचाल करणाऱ्या राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर बँकेच्या मालवण येथील १३ व्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ व्या शाखेचा शुभारंभ रेवतळे येथील वास्तू तथास्तु अपार्टमेंट येथे माजी आमदार तथा सिंधुरत्न समृद्धी योजना समिती सदस्य प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष हनिफभाई काझी, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर,  व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, ओएसडी प्रसन्न मालपेकर, मालवणचे माजी नगरसेवक गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, इमारत मालक निलेश मांजरेकर, रश्मी लुडबे, किसन मांजरेकर, विकी तोरसकर यांसह बँक संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, प्रकाश कातकर, राजेंद्र कुशे, दीनानाथ कोळवणकर, विवेक गादिकर, अनामिका जाधव, किशोर जाधव, विजय पाधे, अल्ताफ संगमेश्वरी, कर्मचारी प्रतिनिधी अनिकेत हेलेकर, रोहित सामंत, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रकाश भावे, सुजाता देसाई, मालवण शाखा व्यवस्थापक निलय हसोटीकर, सहाय्यक सरव्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, चंद्रकांत चौगुले, भुषण म्हापणकर, रिमोह जाधव, अकाउंट विभाग रमेश काळे, आयटी विभाग प्रसन्न खांबे, वरिष्ठ अधिकारी कमल चव्हाण, शुयेब कुडाळकर, प्रथमेश सागवेकर, प्रसाद मोहिते, कुलदीप चव्हाण, महेश पुजारी, लक्ष्मण दुधम तसेच ठेवीदार मधुकर वाईरकर, संजय देसाई, वालकर तसेच अन्य ग्राहक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.  

बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे झाले : शेखरकुमार अहिरे

प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून बँकेची वाटचाल मांडली. बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे शक्य झाले. १०३ वर्षात पदार्पण केलेल्या बँकेची शाखा मालवण शहरात सुरु करताना आनंद होत आहे. बँकेच्या वाटचालीवर लक्ष टाकल्यास डिसेंबर २०२३ अखेर ७०७ कोटी व्यवसाय करताना ४३० कोटींचा टप्पा बँकेने बँकेने गाठला असून १६२ कोटींची गुंतवणूक केली आहे. बँकेचे एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. बँकेला १५ वर्षे बँक अ वर्ग प्राप्त आहे. सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश बँक देत आहे. आधुनिक तंत्रज्ञान बँकेने स्वीकारले आहे. एटीएम, आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल अँप, एसएमएस अलर्ट, युपीआय क्यूआर कोडं, घरपोच सेवा टॅब बँकिंग, मिनी एटीएम, आधारकार्ड लिंक करून थंब द्वारे ग्राहकांना मिनी एटीएम मधून पैसे देणारी राजापूर अर्बन बँक ही महाराष्ट्रातील पहिलीच बँक ठरली आहे. भविष्यात येऊ घातलेल्या अनेक आधुनिक सेवा ग्राहकांना देण्यास बँक तत्पर असल्याचे शेखरकुमार अहिरे यांनी सांगितले. तर माजी नगरसेवक कुशे यांनीही शुभेच्छा दिल्या. 

राजापूर आणि मालवणचा जुना संबंध ; राजापूर बँकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मालवणशी जोडला जाईल : नितीन वाळके

यावेळी नितीन वाळके म्हणाले, बँकेसाठी गुणात्मक वाढ ही सर्वोत्तम ठरते. राजापूर आणि मालवण हा जुना संबंध आहे. आता राजापूर बँकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मालवणशी जोडला जाईल. इतर बँकांशी स्पर्धा करताना सेवाचा दर्जा राखला जाईल. पर्यटन व्यावसायिक, स्थानिक तसेच व्यापारी यांची गरज ओळखून त्या प्रकारे सेवा बँकेच्या माध्यमातून द्यावी, असे सांगत नितीन वाळके यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोरोना लाटेनंतर दोन वर्षाच्या ताळेबंदीनंतर येथील परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब बँक म्हणून सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आज बाजारपेठेला सावकारी व्याजाचा विळखा पडला आहे. तो दूर करण्यासाठी आपण जेव्हा काम करणार आहोत, त्यावेळी खऱ्या अर्थाने सहकारात काम केल्याचे समाधान आपल्याला मिळेल, असे ते म्हणाले.

ग्राहकांना अधिकाधिक व तत्पर सेवा बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न : हनीफभाई काझी

ग्राहकांना अधिकाधिक व तत्पर सेवा बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकारी यांचा नेहमीच राहिला आहे. बँकेवर ग्राहकांचा असलेला विश्वास अधिक दृढ होण्यासाठी आम्ही सेवेच्या माध्यमातून कटीबद्ध राहू. आगामी काळात एक हजार कोटींचा एकूण व्यवसाय हे उद्दिष्ठ साध्य करत राजापूर अर्बन कोकणातील पहिली शेड्युल बँक म्हणून नावारूपास येईल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांनी व्यक्त केला. ४० सभासदांच्या बळावर ही क्रेडिट सोसायटी स्थापन केली. कालांतराने पतसंस्था, बँकेत रूपांतरण झाले. २००७ मध्ये मी सहकार पॅनलच्या माध्यमातून अनिलजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेत आलो. तेव्हा बँकेची ठेव होती 30 कोटी. त्याच काळात योगायोगाने आम्हाला अहिरे साहेबांसारखा एक चांगला अधिकारी मिळाला. आज आम्ही ७०० कोटी पर्यंत पोहोचलो असून बँकेचे डिपॉझिट ४३० कोटी आहे, असे सांगून आम्ही वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असलो तरी बँकेत काम करताना राजकीय चपला बँकेच्या बाहेर काढून येतो. बँकेत कोणतेही राजकारण आम्ही करत नाही. ही बँक म्हणजे आपले कुटुंब आहे, हे समजून बँकेला कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी आमचा प्रत्येक संचालक काम करतो. बँकेत सर्व अधिकार आम्ही कर्मचाऱ्यांना दिले आहेत. योग्य कागदपत्रे असणाऱ्या प्रत्येकाला येथे कर्ज दिले जाते. कागदपत्रे योग्य असतील तर त्याला कोणत्याही संचालकाकडे जायची गरज नाही. त्यामुळेच ही बॅक राजापूर सारख्या छोट्या शहरातून पुढे आली आहे, असे श्री. काझी म्हणाले.

ज्याचा ग्राहक श्रीमंत ती बँक श्रीमंत. आपल्या ग्राहकाला श्रीमंत करा : प्रमोद जठार

बँक चालवणे हे आताच्या काळात कठीण आहे. मात्र १०२ वर्षे ग्राहकांचा विश्वास जपत तत्पर सेवा देणाऱ्या राजापूर अर्बन बँकेचे खरोखर कौतुक आहे. बँक जशी ग्राहकांची काळजी घेते तशी कर्मचारी यांची काळजी निश्चित घेत असेल यात शंका नाही. बँकेचा विस्तार होत असताना १३ वी शाखा मालवण येथे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून राजापूर आणि मालवण हे नाते आहे. आता तर राजापूरची ‘अर्थ’ गंगा मालवणात पोहचली आहे. असे सांगत माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर बँकेचे विशेष कौतुक केले. ज्याचा भक्त श्रीमंत त्याचा देव श्रीमंत. आपल्या बँकेने लक्षात ठेवायला पाहिजे, ज्याचा ग्राहक श्रीमंत ती बँक श्रीमंत. आपल्या ग्राहकाला श्रीमंत करा, त्याच्यासाठी योग्य पैशाचे नियोजन करा, त्याला वेळेवर पैसे द्या, त्याला अडीअडचणीत उपयोगी या. कर्ज न बुडवणाऱ्या ग्राहकांची आयुष्यभर काळजी घ्या. तो तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून येणाऱ्या ग्राहकांना पण बचत कशी करायची यासाठी प्रेरीत करा, असा सल्ला श्री. जठार यांनी दिला.

प्रसन्न मालपेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दीनानाथ कोळवणकर यांनी आभार मानले. मालवण येथे शाखा शुभारंभ करताना पहिल्यांच दिवशी बँकेकडे ३५ लाख ठेवी जमा झाल्या असून १०० पेक्षा जास्त ग्राहकांनी बचत खाती सुरु केली आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!