नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना ; एमएसएमई मंत्रालय नेहमीच सहकार्य करील
विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची ग्वाही ; वायंगवडे गावात जनतेशी मुक्त संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सन २०४७ पर्यत भारत महासत्ता बनण्याचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
आज २१ व्या शतकातही ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान हलाखीचे आहे. आपल्या राज्याचे दरडोई उत्पन्न जवळपास अडीच लाखाचे असतानाही वायंगवडे सारख्या गावाचे दरडोई उत्पन्न केवळ २५ हजारांवर आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारले पाहिजे. यासाठी छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. भारत सरकारच्या या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. उच्च शिक्षण तसेच उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधावी. रोजगार निर्माण करणारे उद्योजक व उद्योग निर्माण होण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण तालुक्यातील वायंगवडे गावात बोलताना दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत २०४७ पर्यत जगात महासत्ता बनेल, असा विश्वासही ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संकल्प यात्रा विकास रथ मालवण तालुक्यातील वायंगवडे गावात गुरुवारी दाखल झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उप विभागीय अधिकारी प्रशांत पानवलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, कृषी अधिकारी संजय गोसावी, उपसरपंच विनायक परब, जेष्ठ कार्यकर्ते जयवंत परब, पोईप सरपंच श्रीधर नाईक, भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यासह अन्य पदाधिकारी विविध खात्याचे अधिकारी, शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, भाजीपाला मिनिकीट लाभार्थी, बेबी किट, यात्रीकीकरण, पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जयवंत परब, सुषमा परब, सौम्या मेस्त्री, निधी सुद्रीक या लाभार्थ्यांनी विचार मांडले. सर्व सामान्य शेतकरी, महिलां तरुण यांच्या पर्यंत विविध योजना तळागलात पोहोचवून मोदी सरकार सर्व सामान्य जनतेला लाभ मिळवून देत आहे. मोदी सरकारचे आम्ही आभारी आहोत अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आरोग्य विभाग, बँक अधिकारी यांनीही माहिती दिली.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, ९० च्या दशकात राणे साहेबांनी कोकण विकास, महाराष्ट्र विकासाची संकल्पना मांडली. आज कोकण, महाराष्ट्र गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा देशभर फिरत आहे. मालवणात या यात्रेचे स्वागत विकासाचे भाग्यविधाते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. हा खरोखरचं अभिमानाचा क्षण आहे. देशाच्या जनतेच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन विकसित व आत्मनिर्भर भारतच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत. हे क्षण गौरवाचे आणि कौतुकाचे आहेत . विकसित भारत यात्रा सर्व योजनांचे लाभ निश्चितच जनतेपर्यंत पोहोचविण्यात लाभदायक ठरेलं असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जनतेशी मुक्तपणे संवाद साधला. येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, महसूल, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशीही मंत्री राणे यांनी संवाद साधला. गावातच मिळणाऱ्या अनेक विविध वस्तूंपासून मोठ्या उद्योग निर्मितीची शक्यता आहे. शेणापासून विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. रंग, गॅस, विज निर्मिती होते. फणस, चिंच यांच्या बियांपासून औषधी पावडर मिळते. अनेक आजारांवर उपयोगी आहे. नारळ उद्योगातूनही अनेक प्रकारच्या वस्तू, मोठे उद्योग निर्मितीची शक्यता आहे. गावातील लोकांनी या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उद्योग व्यवसायातून प्रगती साधली पाहिजे. गाव उद्योग विकासातुन प्रगती साधत असताना दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. सरपंच यांनीही सर्व योजना गावागावात राबवून विकास साध्य करावा. गावात तंटे, वादविवाद व्हायला देऊ नये असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.