भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला भेट
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि देवस्थानच्य कार्यपद्धतीचे केले कौतुक
अक्कलकोट : भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिराला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी स्वामींच्या दर्शनाला दिवसेंदिवस गर्दी वाढत असताना देखील भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि देवस्थानचे सेवेकरी घेत असलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.
अलीकडील काळात भाविकांना स्वामींची प्रचिती मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढलेली आहे. येणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शन व्यवस्था करणे हे मंदिर समितीचे प्रथम कर्तव्य आहे, ही बाब जाणून घेऊन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वतः आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात करून स्वामी सेवेत आपले जीवन अर्पण केले आहे. भक्तांच्या गर्दीमध्ये मंदिरात ते स्वतः पुढाकाराने उभे राहून सर्व स्वामी भक्तांना सुलभ दर्शन कसे घेता येईल याचे नेटाने नियोजन करीत असतात. यानिमीत्ताने वटवृक्ष मंदिर समितीच्या या नियोजनाने सर्व भाविकांना सुलभ स्वामी दर्शन लाभून समाधान लाभते. त्यामुळे वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्य पद्धतीने भाविकांचे मनोभावे स्वामी दर्शनाने समाधान होत असल्याचे मनोगत चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी चित्रा वाघ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या समवेत मंदिर समितीचे ज्येष्ठ लिपिक संजय पवार, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे, वैभव जाधव, चंद्रकांत कवटगी, अविनाश क्षीरसागर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.