नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना निलेश राणेंचा मदतीचा हात
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लावणी नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ विद्यार्थिनींची निवड
मालवण | कुणाल मांजरेकर
२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्याची निवड झाली आहे. या नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच विद्यार्थिनींचा समावेश असून या विद्यार्थिनींना दिल्ली येथे जाण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांनी आर्थिक मदत दिली आहे. ही मदत भाजपच्या मालवण कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आली.
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी “वंदे भारतम्” कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या नृत्यात कु. करीना खराडे (मालवण), कु. ऋतुजा राणे (मालवण ), कु.समिता कुबल (मालवण), कु. ममता गावडे (वेंगुर्ला), कु.सानिका केरकर (कुडाळ) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे जाण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक निलेश राणे यांनी आर्थिक मदत करून सहकार्य करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते ही मदत देण्यात नवी. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, संतोष गावकर, रवि घागरे, पंकज गावडे, संकेत कुलकर्णी, संकेत हसोळकर आदी उपस्थित होते.