धुरीवाडा साईमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
आज रात्री जंगी भजनबारी, उद्या साईंची पादुका पालखी मिरवणूक तर मंगळवारी महाप्रसाद भंडारा
मालवण : मालवण शहरातील साईनगर धुरीवाडा येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन महोत्सव सोहळ्यानिमित्त १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ देवली मालवणचे बुवा महेश मालप, पखवाज बबन मेस्त्री, तबला दुर्गेश मेस्त्री विरुद्ध गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवलीचे बुवा उमेश वंजारे, पखवाज गजानन देसाई, तबला शुभम सुतार यांच्यात जंगी भजनबारी होणार आहे.
२४ रोजी सकाळी ६.३० वाजता साई नैमित्तिक पूजा, ७ वाजता साई दुग्धाभिषेक, सायंकाळी ४ वाजता साई पादुका पालखी मिरवणूक होईल. २६ रोजी सकाळी ६.३० वाजता साई सगुण पूजा, ७ वाजता साई दुग्धाभिषेक, ११ वाजता सामुदायिक सत्यनारायणाच्या महापूजा, १.३० वाजता महाप्रसाद भंडारा, सायंकाळी ६.४५ वाजता साईंची महाआरती, ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचे दैव किती अविचारी हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. याच दिवशी दत्त जयंती सोहळाही होणार आहे. २७ रोजी रात्री ९ वाजता सुभेदार हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.