मालवणात साजरा होणारा नौदल दिन महाराष्ट्रासाठी भूषणावह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; राजकोट मधील शिवपुतळ्याच्या कामाची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार ; मालवणचा सोहळा न भूतो न भविष्यति होणार
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण सह तारकर्ली मध्ये नौसेना दिनाचा कार्यक्रम येत्या ४ डिसेंबरला साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राजकोट मध्ये नौसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारी वेशातील पुतळा उभारला जात असून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राजकोटला भेट देऊन कामाची पाहणी केली. अत्यंत कमी कालावधीत नौसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे काम करण्यात आले असून मालवण मध्ये नौसेना दिनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नौसेनेचे आभार व्यक्त करतो. मालवण मधील रोजी ४ डिसेंबरचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी मालवणला भेट दिली.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, माजी आमदार राजन तेली, रवींद्र फाटक, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, बबन शिंदे, राजा गावकर, विजय केनवडेकर, सौरभ ताम्हणकर यांच्यासह शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राजकोट येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण शहरातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा क्षण महाराष्ट्रा बरोबरच संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवण मध्ये येत आहेत. त्यामुळे संपूर्ण शासन या ठिकाणी काम करत आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत हे काम करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अत्यंत कमी कालावधीत उभारण्यात आला आहे. नौसेना दिनाचा कार्यक्रम आतापर्यंत दिल्लीत व्हायचा. परंतु आता आपल्या राज्यात हा कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना हे विनम्र अभिवादन आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक होते, त्यामुळेच येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेव्हीचे आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आभार मानत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.