नौदल दिनाचा नेत्रदीपक सोहळा सर्वसामान्यांना देखील पाहता येणार !
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती : राजकोट, तारकर्ली येथील कामांचा आढावा
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ४ डिसेंबर रोजी मालवण, तारकर्ली दौऱ्यावर येत आहेत. राजकोट येथे उभारणी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. तारकर्ली ते किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसर याठिकाणी नौसेना दिन सोहळा संपन्न होणार आहे. नौदल, शासन यांच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारणी नियोजन सुरु आहे. सर्वसामान्यांना नौसेनेचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. दांडी आणि तारकर्ली याठिकाणी खास व्यवस्था करण्यात येत आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी आपण केलेली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीने हा कार्यक्रम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. ना. चव्हाण यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या समवेत आज मालवण, तारकर्लीला भेट देऊन पाहणी केली. यानंतर मालवण येथील स्वामी हॉटेल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दिवसभरात पालकमंत्र्यांनी किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी काम, तारकर्ली येथे नौसेना दिन कार्यक्रम व्यवस्था, टोपीवाला बोर्डिंग मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, अशोक सावंत, राजन वराडकर, सचिन आंबेरकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, राजू परुळेकर, संतोष साटवीलकर, आशिष हडकर, ललित चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह काही केंद्रीय मंत्री व राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चीत झालेला आहे. तसेच याठिकाणी सर्व नियोजन सर्व प्रकारची दक्षता घेवून कार्यक्रमाचे व्यवस्था केली जात आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले. नौसेना दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या किनारी होणार आहे. जनतेला हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी व्यवस्था करण्याचे, नियोजन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.