पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा वायरी देवली ग्रामस्थांना फायदा ; अनेक वर्षे प्रलंबीत रस्त्यांचे नूतनीकरण
ग्रामस्थांच्या वतीने मंदार लुडबे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ना. राणे, ना. चव्हाण व भाजपा नेते निलेश राणेंचे आभार
मालवण : मालवण तालुक्यातील वायरी देवली उखडून, शासकीय तंत्रनिकेतन रस्ता तसेच शासकीय तंत्रानिकेतन मधील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यामुळे या सर्व रस्त्यांचे नूतनीकरण झाले आहे. यांमुळे ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह या कामासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आपण आभार मानत असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली आहे.
वायरी देवली गावातील हे रस्ते नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षे गैरसोय होत होती. या कामासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या रस्त्यांच्या कामाला गती येत नव्हती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने हे रस्ते दुरुस्त झाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे, असे मंदार लुडबे यांनी म्हटले आहे.