कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा द्या, अन्यथा…
कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांचा महावितरणच्या अधिकारी, ठेकेदाराला इशारा
कामगारांच्या प्रश्नांबाबत जयेंद्र रावराणे, अशोक तोडणकर यांच्यासह अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा ; मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती
कुडाळ : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दीड वर्षात तब्बल सात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना सेवेत असताना प्राण गमावावे लागले आहेत. त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. महावितरणकडे काम करणारी ही मुले म्हणजे आपल्या जिल्ह्याची संपत्ती आहे. त्याची अशीच हानी होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ठेकेदाराने दिलेल्या अटी शर्ती प्रमाणे काम करावे तर अधिकारी वर्गाने देखील या कामावर नियंत्रण ठेवावे, यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास गप्प बसणार नाही, प्रसंगी काम बंद सारखे हत्यार उगारावे लागेल, असा सज्जड इशारा माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासह महावितरणच्या ठेकेदाराला दिला आहे.
कुडाळ विभागातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात सोमवारी कामगार वर्गाची ठेकेदारासमवेत बैठक घेण्यात आली. त्यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला जावेद खातीब, शेखर गावकर, संदीप बांदेकर यांच्यासह अन्य कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दीड वर्षात लाईनवर काम करत असताना विजेच्या धक्क्याने जिल्हयातील सात तरूण मृत्युमुखी पडले. आपला जीव धोक्यात घालून ही मुले प्रामाणिकपणे महावितरणचे काम करतात. त्यामुळे यापुढे तुम्ही निविदेतील अटी, शर्ती नुसार काम करा. आम्ही निविदेच्या आड येणार नाही. मात्र वीज कंत्राटी कामगारांवर यापुढे अन्याय होता कामा नये, असे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी सांगितले. तसेच अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनाही श्री. रावराणे यांनी धारेवर धरत या ठेकेदारावर वचक ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सुनावले. यापुढे निविदेतील अटी, शर्ती नुसार आपण सिंधुदुर्गात काम करू, कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही ठेकेदाराने यावेळी दिली.
अशोक सावंत यांना विश्वासात घेऊन काम करा
माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी मागील १५ वर्षे अशोक सावंत हे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत असून यानंतरच्या काळात महावितरणचे कामगार वर्गाशी संबंधित कोणतेही प्रश्न अगर समस्या असतील तर अशोक सावंत यांच्याशी बोलूनच त्यावर ठेकेदाराने निर्णय घ्यावेत अशी सूचना केली. तर अशोक सावंत यांनी गेली १५ वर्षे आपण कामगार वर्गाकडून एक रुपयाचीही पावती न फाडता नि:स्वार्थीपणे कंत्राटी वीज कामगारांच्या संघटनेचे नेतृत्व करीत असून यानंतरच्या काळातही कामगार वर्गा संदर्भात कोणत्याही चर्चा करायच्या असल्या तर त्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच व्हाव्यात, असे सांगितले.
अशोक सावंत, जयेंद्र रावराणे, अशोक तोडणकर यांनी जिल्हयात झालेल्या अपघाताची जंत्री वाचली. तसेच कंत्राटी वायरमनांना सुरक्षिततेसाठी ठेकेदाराकडून कोणतेही साहित्य दिले जात नाही, त्यांना ओळखपत्र नाही, विमा कार्ड नाही, ड्रेस नाही हे सर्व पुरविण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल करत तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हयात चांगले सहकार्य हवे असेल तर नियमात राहून काम करा. अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दम ठेकेदाराला दिला. अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना श्री. रावराणे यांनी खडेबोल सुनावत महावितरणचे प्रमुख म्हणून तुम्हीसुध्दा जबाबदारीने लक्ष द्या, यापुढे निष्काळजीपणामुळे अपघात होवून कामगार दगावल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगितले. अशोक सावंत यांनीही कंत्राटी कामगारांचे न्याय प्रश्न उपस्थित करत कंत्राटी कामगारांची वेळ निश्चित व्हावी. कुठच्या पोलवर कधी चढावे हे निश्चित करून द्यावे, अपघात गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दम ठेकेदाराला दिला. अपघात झाल्यानंतर जिल्ह्यातील आम्हीच मंडळी प्रथम अपघातस्थळी असतो, ठेकेदार आपल्या गावी बिनधास्त असतो, हे यापुढे होवू नये, अशी विनंती केली. अधिक्षक अभियंता यांनीही ठेकेदाराला यापुढे आवश्यक ते साहित्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरवा, नियमात राहून काम करा अन्यथा तुमची एजन्सी ब्लॅक लिस्टमध्ये टाकली जाईल, असा इशारा दिला. ठेकेदाराने यापुढे आपल्यापर्यंत कोणतीही तक्रार येणार नाही, याची जबाबदारी घेतली. तसेच नियमात राहून काम केले जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, ठेकेदाराने नेमलेल्या सुपरवायझर बाबत कामगारांच्या तक्रारी असून कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्यातीलच व्यक्तीची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कै. तनय सावंतच्या वडिलांकडे २० हजारांची मदत
महावितरणचे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत तनय सावंत यांचा वर्षभरापूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तनयच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी काही पैसे जमा केले होते. ते पैसे तनयच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेच नाहीत, असे अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्यासमोर सांगितले. याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगून काहीजणांकडे जमा असलेली २० हजार रुपयाची रक्कम यावेळी अधीक्षक अभियंता श्री.पाटील व माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते कै. तनय सावंतच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.