वाहनास धडक दिल्याच्या रागातून मारहाण केल्याच्या आरोपातून ५ जणांची निर्दोष मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले
मालवण : वाहन अपघाताच्या रागाने फिर्यादीस मारहाण केल्याच्या गुन्ह्यातून पाच जणांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले. आरोपींमध्ये अमेय लक्ष्मण शिंदोळकर (वय २८), फान्सीस झुजे फर्नांडीस ( वय २५), ब्रायन कैतान फर्नांडीस (वय २८), कौस्तुभ संदिप किर्तने (वय २४) व निखिल शैलेंद्र हिंदळेकर (वय २३, सर्व रा. मालवण, ता. मालवण) यांचा समावेश आहे.
९ मे २०२२ रोजी देवली येथे मामाचा गाव या हॉटेल जवळ आरोपींनी त्यांच्या ताव्यातील स्वीफ्ट डिझायर गाडी अतिवेगात चालवून फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. व आरोपींनी फिर्यादीशी हुज्जत घालत शिवीगाळ करीत फिर्यादीस हाताच्या थापटाने मारहाण केल्याची फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून मालवण पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम १४३, १४७, २७९, ४२७, ५०४, ५०६, ३४, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आरोपी विरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांच्या न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचे व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती व वैदयकीय पुरावा व तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.