किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी थेट समुद्रात उतरून उपोषण

मालवणात पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांचे अनोखे उपोषण ; अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने बंदर जेटी येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी मंगळवार पासून येथील समुद्राच्या पाण्यात जाऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

येथील बंदर जेटी परिसरातील श्री. तोडणकर यांचे निवास स्वरूपातील बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्ग ओरोस यांच्या नोटीसी नंतर जमीनदोस्त केले होते. याठिकाणी असलेली झाडेही तोडण्यात आली. हे बांधकाम हटवित असताना किनारपट्टीवरील अन्य ६७ बांधकाम धारकांची यादी समोर आली होती. त्यांनाही अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम तोडण्याबाबत ७ दिवस मुदतीच्या नोटीसा प्रशासनाने बजावण्यात आल्या होत्या. नोटीस कालावधी संपल्यावर अन्य बांधकामे बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणेने हटविण्याची कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र याची कार्यवाही न झाल्यानेच आपण प्रशासनाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण छेडले आहे. बंदर विभागाने आकसापोटी, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली आहे. एका बंदर अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली. त्याला पैसे न दिल्याने बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात आली. नोटीसा बजावण्यात आलेली बांधकामे न पाडल्याने तसेच बंदर जेटी समोरील झाडे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत कारवाई करण्यात यावी असे सांगून आंदोलनाची पुढील दिशा मालवण बंदर विभाग अथवा तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आत्मदहन करणार असल्याचे श्री. तोडणकर यांनी स्पष्ट करत या सर्वाला प्रशासनच जबाबदार असेल असेही म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!