आचऱ्यात पुन्हा एकदा “दत्ता तिथे सत्ता”चा प्रत्यय ; ग्रा. पं. निवडणुकीत भाजपचा मोठा विजय !

आ. वैभव नाईकांना धक्का ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव ; सरपंच पदासह ग्रा.पं. च्या १३ पैकी ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी

सरपंच निवडणूकीत जेरोन फर्नांडीस यांच्याकडून ठाकरे गटाच्या मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव

२०२४ मध्ये कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे यांच्या विजया पर्यंत भाजपाची घोडदौड सुरूच राहणार : दत्ता सामंत

मालवण | कुणाल मांजरेकर

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार जेरोन फर्नांडीस यांनी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव केला असून या ग्रा. पं. च्या १३ पैकी ११ जागा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तर ठाकरे गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत हे गेले दहा दिवस आचरा गावात तळ ठोकून होते. त्यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी प्रचाराची रणनिती आखण्यात आली होती. या विजयामुळे “दत्ता तिथे सत्ता” या गणितावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक भाजपा आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनली होती. याठिकाणी भाजपने जेरोन फर्नांडीस तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने माजी सरपंच मंगेश टेमकर यांना सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते. भाजपच्या प्रचारासाठी दत्ता सामंत दहा ते बारा दिवस येथे तळ ठोकून होते. तर भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, संतोष कोदे, संतोष गावकर, राजन गावकर, नीलिमा सावंत, शेखर मोर्वेकर, दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, दीपक सुर्वे तसेच आचरा गावातील स्थानिक भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी मेहनत घेतली होती. तर ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक स्वतः तळ ठोकून होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काल याठिकाणी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आल्यानंतर आज तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. याठिकाणी भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस यांनी १४३५ तर ठाकरे गटाचे सरपंच उमेदवार मंगेश टेमकर यांनी ११९३ मते मिळवली. तर जगदीश पांगे यांना ७० मते मिळाली. जेरॉन फर्नांडिस हे २४२ मतांनी विजयी झाले.

ग्रा. पं. सदस्य निकाल पुढीलप्रमाणे –

आचरा प्रभाग एक: सरपंच मंगेश टेमकर (३२०), जगदीश पांगे (१६). – जेरॉन फर्नांडिस (३३३), नोटा (११) प्रभाग एक: उमेदवार सारिका तांडेल (३३८ विजयी), प्रिया मेस्त्री (३००), पूर्वा तारी (३०० विजयी), प्रियता वायंगणकर (२७३) गौरी सारंग (८८), नोटा (१९) मुजफ्फर मुजावर (३७६ विजयी), चंद्रशेखर मुणगेकर (२८९), नोटा (१६). प्रभाग दोन सरपंच मंगेश टेमकर (२७२), जगदीश पांगे ( ३९ ) ( जेरॉन फर्नांडिस ३६१), नोटा (९). उमेदवार शाहिन काझी (९७), अनुष्का गावकर (३२९ विजयी), प्राजक्ता देसाई (३१२), सुकन्या वाडेकर (२७८), सायली सारंग (३२१ विजयी), नोटा (२५) योगेश गावकर (३०८ विजयी), जगदीश पांगे (१५८), सचिन बागवे (२०२), नोटा (१३) प्रभाग तीन सरपंच मंगेश टेमकर (१०८) जगदीश पांगे (७) जेरॉन फर्नांडिस (१४७), नोटा (१) उमेदवार श्रद्धा सक्रु (९३) श्रुती सावंत (१६८ विजयी), नोटा (२) चंद्रकांत कदम (१५७ विजयी), अनिकेत मांजरेकर (१०४), नोटा (२) प्रभाग चार सरपंच मंगेश टेमकर (१५४). जगदीश पांगे (३), जेरॉन फर्नांडिस (२३९), नोटा (२) उमेदवार हर्षदा पुजारे (२७५ विजयी), युगंधरा मोर्जे (११४), नोटा (९) महेंद्र घाडी (२६१ विजयी), सदानंद घाडी (१३१), नोटा (६) प्रभाग पाच सरपंच मंगेश टेमकर (३३९). – जगदीश पांगे (५), जेरॉन फर्नांडिस (३५५), नोटा (११) उमेदवार पंकज – आचरेकर (३८४ विजयी), चंदन पांगे (३०७), नोटा (१९) किशोरी आचरेकर ( ३९३ विजयी), अमृता गावकर (२९७), नोटा (२०) संतोष मिराशी ( ३९९ विजयी), माणिक राणे (२९६), नोटा (१५).

ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. “निलेश राणे आगे बढो” अशा घोषणा देत दत्ता सामंत यांनी या विजयाचे श्रेय भाजपा नेते निलेश राणे यांना दिले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, राजन गावकर, संतोष कोदे, नीलिमा सावंत, सुनील घाडीगांवकर, संतोष गावकर, राजू परुळेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ज्ञानदेव पाटील, विजय केनवडेकर, भाई मांजरेकर, राजू प्रभुदेसाई, दयानंद देसाई, ललित चव्हाण, महेश सारंग, प्रकाश तोंडवळकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आचऱ्याच्या रामेश्वराच्या साक्षीने भाजपच्या विजयाची सुरुवात : दत्ता सामंत

आमदार वैभव नाईक यांनी आजपर्यंत आमदारकीच्या नऊ वर्षात कोणतेही ठोस विकास काम न करता लोकांना फक्त खोटी आश्वासने आणि खोटी पत्रे दिली. आचऱ्याच्या निकालातून मतदारांनी आम. वैभव नाईक यांना चपराक दिली आहे. आचऱ्याच्या रामेश्वराच्या साक्षीने भाजपच्या विजयाची सुरुवात झाली असून २०२४ मध्ये कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे यांच्या विजया पर्यंत भाजपाची घोडदौड थांबणार नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या माध्यमातून आम्ही आचऱ्याची निवडणूक आम्ही लढवत होतो. आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कुडाळ मालवणचे भावी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून हा विजय आम्ही संपादन करू शकलो आहोत. याठिकाणी विद्यमान सरपंच यांसह उबाठा गटाचे आमदार, खासदार, नेते ठाण मांडून बसले होते. मात्र आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरोघरी जाऊन राणेसाहेबानी केलेलं काम, पालकमंत्र्यांनी केलेलं काम निलेश राणे ज्या पद्धतिने काम करीत आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. म्हणूनच जेरोन फर्नांडीस यांचा मोठा विजय येथे झाला आहे.

मागील आठवड्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंदर गावात कोट्यावधीच्या विकास कामांची भूमिपूजने केली होती. अशा प्रकारचे काम पालकमंत्र्यांकडून, राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी होत आहे. तर भाजपा नेते निलेश राणे जास्तीत जास्त निधी कुडाळ मालवण मतदार संघांसाठी आणत आहेत. त्यामुळेच आचरा येथे भाजपाला मोठा विजय मिळाला आहे, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!