आचरा ग्रा. पं. निवडणुकीसाठी ६६ % मतदान ; भाजपा – ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला !

उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष ; मालवण तहसील कार्यालयात होणार मतमोजणी

आचरा | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी ६६ टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी ३ तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी २९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. प्रभाग क्र. ५ वरचीवाडी केंद्रातील मतदान मशिन मतदान सुरु झाल्यानंतर काहीवेळाने बंद झाली. नवीन मशिन जोडून पाऊण तासाच्या विलंबानंतर मतदान ‘चालू झाले. निवडणूक अधिकारी संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर व आचरा पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग २ मध्ये मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान चालू होते. मतदानाची प्रक्रिया चालू होती. निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवारी) मालवण तहसील कार्यालयात होणार आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आचरा ग्रा. पं. निवडणूक मतदानास सकाळी ७.३० वा. सुरुवात झाली. प्रभाग ५ वगळता इतर प्रभागामध्ये मतदान वेळेत चालू झाले. मात्र प्रभाग ५ वरचीवाडी केंद्रातील मतदान मशीन सकाळी मतदान चालू झाल्यानंतर काहीवेळाने बंद पडली. त्यानंतर निवडणूक अधिकारी केंद्रावर दाखल झाले होते. बंद पडलेल्या मशीनच्या ठिकाणी दुसरी मशीन जोडण्यात आली. तब्बल पाऊण तासानंतर पुन्हा मतदानास या केंद्रावर सुरूवात झाली.

आचरा ग्रा. पं. च्या ४१४६ एकूण मतदारापैकी २६९७ मतदान झाले. यापैकी १३५२ पुरूष मतदारांनी तर १३४५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १ हिर्लेवाडी, पिरावाडीतील मध्ये एकूण मतदान ६८० झाले. या मतदानापैकी पुरूष ३४७ तर ३३३ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग २ जामडूल गाऊडवाडी, काझीवाडा शेखवाडा, डोंगरेवाडी अंदाजित ६४३ मतदान झाले होते. प्रभाग ३ पारवाडीमध्ये २६३ मतदान झाले. या मतदानापैकी पुरूष १४२ तर १२१ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ४ मेस्त्रीवाडी, देऊळवाडी, बाजार, बौद्धवाडी मध्ये ३९८ मतदान झाले. या मतदानापैकी पुरुष २११ तर १८७ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ५ वरची वाडी भंडारवाडी नागोचीवाडी मध्ये ७१० मतदान झाले. या मतदानापैकी पुरूष ३५७ तर ३५३ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला.

मालवण तालुक्यातील एकमेव आचरा ग्रा. पं. निवडणूक असल्याने सर्वच पक्षाचे पदाधिकारी आचरा गावात ठाण मांडून होते. भाजपचे नेते दत्ता सामंत, नीलिमा सावंत, संतोष कोदे, राजन गावाकर, धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, बबन शिंदे, राजा गावकर यांचा समावेश होता. तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, नारायण कुबल व अन्य पदाधिकारी दाखल झाले होते. आचरा ग्रा. पं. सरपंच पदाचे भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार जेरोन फर्नांडिस व ठाकरे सेनेचे मंगेश टेमकर यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा जोरदार चालू होती. आचरा ग्रा. पं. निवडणुकीत भाजप शिवसेना पुरस्कृत पॅनल व ठाकरे सेनेच्या पॅनलच्या वतीने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आचरा ग्रा. पं. वर झेंडा फडकवणार असल्याचा दावा केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!