आचरा ग्रा. पं. निवडणूक | जनतेच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित ; मंगेश टेमकर यांचा विश्वास
जनतेच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त
मालवण | कुणाल मांजरेकर
आचरा गावचा सर्वांगीण विकास साध्य करत असताना जनतेला अपेक्षित पद्धतीने विकास झाला पाहिजे हीच भावना आमची कायम राहणार आहे. वाडी वस्तीवरील जनता जे विकासकाम सुचवेल तेच प्राधान्याने करणे हेच आमचे कर्तव्य राहणार आहे. जनतेचा शब्द प्रमाण मानून जनसेवेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आम्ही सर्व उमेदवार कार्यरत राहू. आचरा वासिय जनतेच्या आशीर्वादरुपी मतांनी आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांसह सदस्यांनी व्यक्त केला आहे.
रविवारी ५ नोव्हेंबर रोजी आचरा ग्रामपंचायतसाठी मतदान होत आहे. प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. प्रचार सांगता दरम्यान मंगेश टेमकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. श्री देव रामेश्वरचे आशीर्वाद व जनतेचा पाठिंबा यावरच आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर व सर्व १३ सदस्य उमेदवार यांना जनतेने प्रचार दरम्यान चांगला प्रतिसाद दर्शवला. जनतेच्या विश्वासरुपी पाठिंब्यावर मंगेश टेमकर व सर्व उमेदवार यांचा विजय निश्चित होईल. असा विश्वास महाविकास आघाडी पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व महाविकास आघाडी सरकार माध्यमातून जास्तीत जास्त निधी आचरा गावात आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. गावचा विकास, तरुण-तरुणीना रोजगार, शेती, मत्स्य व पर्यटन प्रकल्प आणणे याला प्राधान्य राहणार असल्याचे मंगेश टेमकर यांनी सांगितले.
आचरा निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवर मंगेश टेमकर यांसह सदस्य उमेदवार म्ह्णून प्रिया मेस्त्री, पूर्वा तारी, चंद्रशेखर मुणगेकर, अनुष्का गावकर, सुकन्या वाडेकर, सचिन बागवे, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, युगंधरा मोरजे, सदानंद घाडी, चंदन पांगे, अमृता गांवकर, माणिक राणे आदी निवडणूक रिंगणात आहेत. यांना आचरा वासिय जनता विजयी करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.