आचरा ग्रा. पं. निवडणूक : सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल
मालवण : तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसा पर्यंत सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली.
आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उबाठा गट, शिवसेना शिंदे गट, भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर असून याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून चिन्हही वाटप केले जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.