राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटन वाढीसाठी मैलाचा दगड ठरेल

माजी आ. प्रमोद जठार यांचा विश्वास ; पुतळ्याठिकाणी “लेझर अँड लाईट शो” साठी सिंधुरत्न मधून ५ कोटींचा निधी देण्यासाठी प्रयत्न

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पर्यटन १५ दिवस बंद राहणार ह्या अफ़वाच ; आवश्यक त्या ठिकाणीच मज्जावाला प्रतिबंध असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्यदिव्य स्वागत होणार : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या किनारपट्टीवर स्वतः किल्ले सिंधुदुर्गची मुहूर्तमेढ रोवली. किल्ले सिंधुदुर्ग व अन्य गडकोट उभारणी करून सगळ्या समुद्री आक्रमणाना रोखले. म्हणूनच ‘फादर ऑफ इंडीयन नेवी’ म्हणूनही छत्रपतींचा गौरव होतो. अश्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण किनारपट्टीवर किल्ले राजकोट येथे उभा राहत आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति’ ठरणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने मालवणचं पर्यटन १५ दिवस बंद राहणार असल्याची अफ़वा पसरवली जात आहे. मात्र हे चुकीचे असून अत्यावश्यक ठिकाणीच फिरण्यास प्रतिबंध असेल, असे स्पष्टीकरण माजी आमदार प्रमोद जठार यांनी किल्ले राजकोट येथे केले. राजकोट येथील पुतळा उभारल्यामुळे येथे एक नवीन पर्यटनस्थळ उभे राहणार आहे. याठिकाणी सिंधुरत्न योजनेतून ५ कोटी रुपये खर्चून “लेझर अँड लाईट शो” सुरु करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाणांमार्फत प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग परिसरात तसेच मालवण किनारपट्टीवर साजरा होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी होत आहे. या कामाची पाहणी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शनिवारी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, बबन रेडकर, जॉन नरोना, युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, नारायण धुरी, नंदू देसाई यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुतळा उभारणी कामाला चांगली प्रगती आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यासह सर्वांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी हा उत्सव ४ डिसेंबर ला होणार आहे. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा असणार आहे. यापूर्वी किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी झेंडा उभारणी मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकाळात झाला. सुदेश आचरेकर त्यावेळी नगराध्यक्ष होते. त्यानंतर हा सोहळा संपन्न होत आहे. हे दुसरे पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हल्ला करणाऱ्या परप्रांतीय आक्रमणला परतवून लावले. सनातन धर्म हिंदू धर्म टिकवणे कार्य ज्या आमच्या राजाने केले त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी ४ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्र, कोकण वाजत गाजत याठिकाणी येणार आहे. कोकणातील गडकिल्ले येथील माती कलश माध्यमातून वाजत गाजत याठिकाणी आणणार आहे. असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

भारतीय नेवी, सार्वजनिक बांधकाम विभाग गतिमान व चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आमचे सर्व सहकारी यांचेही लक्ष आहे, सहकार्य आहे. असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा येथून अनेकजण येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही उत्साहात भव्यदिव्य स्वागत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य याकाळात मला लाभले आहे, याचाही आनंद आहे. एकूणच या ऐतिहासिक सोहळ्यात नवीन ऊर्जा प्राप्त होईल, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

१५ दिवस व्यवसाय बंद राहणार ह्या अफ़वा

काही लोकांच्या मनात शंका पसरवाल्या जात आहेत. आठ पंधरा दिवस दुकानें बंद राहणार अश्या अफ़वा पसरवल्या जात आहेत. मात्र असे काही होणार नाही. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा दृष्टीने काही काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. मात्र आठ पंधरा दिवस पूर्णपणे बंद नाही ठेवले जाणार. याबाबत पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. असे प्रमोद जठार यांनी सांगितले. किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी नंतर त्या ठिकाणी सायंकाळ नंतर लेझर शो होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. दर दिवशी सायंकाळी-रात्री या लेझर शो माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पर्यटक यांना उलघडून सांगितला जाईल. रत्नसिंधु योजनेतून यासाठी ५ कोटी निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!