मसुरे येथील विमा सल्लागार, सामाजिक कार्यकर्त्या संगीता नार्वेकर यांचे निधन…

बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार ; परिसरावर शोककळा

मालवण : येथील एलआयसीच्या विमा सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्त्या संगीता गणपत नार्वेकर (वय ४७, रा. मसुरे सय्यद जुवा) यांचे बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास निधन झाले. गुरुवारी दुपारी बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येथील व्यापाऱ्यांनी, रिक्षा व्यवसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने मसुरे बांदिवडे गावावर शोककळा पसरली आहे.

संगीता नार्वेकर मालवण तालुक्यामध्ये एलआयसी विमा सल्लागार म्हणून सर्वांना परिचित होत्या. एलआयसी कंपनीच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. नुकताच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल मानवता विकास परिषदचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. गावातील अनेक संस्थांमध्ये त्या कार्यरत होत्या.
मसुरे, बांदिवडे गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान फार मोठे होते. तसेच कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी सर्वांना त्यांनी मदत केली होती. आर. पी. बागवे हायस्कूलच्या सांस्कृतिक कमिटीच्या त्या सदस्या होत्या. त्यांनी गावातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत केली. तसेच गावातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. कट्टा येथील प. पू. राणे महाराज यांची ती निःसीम सेविका होती. गरीब गरजू कुटुंबांना एलआयसीच्या माध्यमातून तिने अनेक वेळा मोठ्या मदती मिळवून दिल्या होत्या. मालवण तालुक्यामध्ये सर्वांशी तिचे चांगले संबंध होते. सर्वांशी ती मिळून मिसळून वागत असायची. तिच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार असून मालवण येथील पारिजात हॉटेलचे मालक शाम आणि सुंदर नार्वेकर, युवा सामाजिक कार्यकर्ते संजय आणि शंकर तसेच जुन्या काळातील प्रसिद्ध युवक काँग्रेस नेते कै.राजू नार्वेकर यांची ती बहिण होतं.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!