मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी “हिंमत” हा घटक महत्वाचा !

कॅप्टन आशुतोष आपंडकर यांचे प्रतिपादन ; सिंधुदुर्ग महाविद्यालयात मर्चंट नेव्हीबाबत मार्गदर्शन संपन्न

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंड ॲग्रीकल्चर, ट्रेनिंग शीप रहमान आणि मराठी व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मर्चंट नेव्ही विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक कॅप्टन आशुतोष आपंडकर यांनी मर्चंट नेव्हीचे स्वरूप, परीक्षा पद्धती, उमेदवाराची पात्रता, मर्चंट नेव्ही मधील करियरच्या संधी व टप्पे, तसेच विद्यार्थिनींसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी यावर प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. मर्चंट नेव्ही मधील सर्व संधींचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची अट लागू असते ती म्हणजे “हिंमत”. विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून बाहेर पडण्याची, विविध देशांमध्ये जाण्याची व मर्चंट नेव्हीमध्ये कर्तृत्व दाखवण्याची हिंमत दाखवावी” असे आवाहन त्यांनी केले. तसेच श्रोत्यांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली .

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, प्रमुख मार्गदर्शक वक्ते कॅप्टन डॉ. आशुतोष आपंडकर, कॅप्टन सचिन कांबळे, कॅप्टन अश्विनी देशमुख, कॅप्टन मनिषा कोडे, शशांक कोडे, सुभाष मयेकर, श्री. बांदेकर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव गणेश कुशे, संस्थेचे सदस्य विजय केनवडेकर, प्रभारी प्राचार्य कैलास राबते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन विजय केनवडेकर यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष दिपक मुळीक – परब यांचा उत्कृष्ट उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मधील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे सचिव गणेश कुशे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष पेडणेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या करियरसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्री. कुशे यांनी संस्थेच्या कार्याची व महाविद्यालयाची उपस्थितांना ओळख करून दिली.

यावेळी कॅप्टन सचिन कांबळे यांनी मर्चंट नेव्हीतील संधींचा फायदा घेताना कोणते गुण आवश्यक आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मर्स्क या नामांकित शिपिंग कंपनीचे अधिकारी श्री. नितीन यांनी प्रशिक्षणाचे विविध टप्पे व मानधन याविषयीचे स्लाइडशो माध्यमातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण, एम्. जी. बागवे काॅलेज मसुरे, रामभाऊ परूळेकर महाविद्यालयाचे व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. स्नेहा बर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!