मालवण नगरपरिषद आणि कर्मचाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा…
पालिका कर्मचाऱ्यांची मागणी ; पालिकेबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन
मालवण : मालवण नगरपालिका व कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मालवण नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे.
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ६ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आयोजित अमृत कलश यात्रेसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांसह आपला सहभाग नोंदवून हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत संकलित केलेल्या मातीचा अमृत कलश घेऊन प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी सिंधुदुर्गनगरी येथे गेले होते. यावेळी शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवल्या होत्या. तसेच नागरिकांसाठी पालिकेतील सर्व विभागातील कामे सुरू राहावीत यासाठी आवश्यक कर्मचारी पालिकेत उपस्थित होते असे असताना काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांनी पालिकेत येऊन पालिकेचे कर्मचारी उपस्थित नसल्याचे भासवून पालिका प्रशासक, कर्मचारी व पालिकेची बदनामी केली. पालिकेवरील आकसापोटी व वैयक्तिक कामासाठी पालिकेत येऊन केलेली कृती आहे. इतर कोणत्याही नागरिकांची गैरसोय झाल्याची तक्रार प्राप्त नाही. त्यामुळे श्री. अंधारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे.