“MKCL” मार्फत पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा
प्रत्येक विद्यार्थ्याचं टॅलेंट शोधणारी विशेष ऑलिम्पियाड परीक्षा ; जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन
मालवण : जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. त्यादृष्टीने ५ वी ते ९ वी मधील एसएससी बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी MKCL च्या वतीने राज्यस्तरीय ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा परीक्षा १ ते ३० नोव्हेंबर मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील प्रश्नप्रकार आणि प्रश्नांचे स्वरूप हे जागतिक पातळीवरील मानकांनुसार तयार केले गेले आहेत. या स्पर्धा परीक्षेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर काही लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) सिंधुदुर्गच्या वतीने प्रणय तेली यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
यामध्ये MKCL च्या केंद्रात कंप्यूटरवर परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांच्या विविधांगी शैक्षणिक गुणवत्तेला आणि बुद्धीला आव्हान देणारे प्रश्न दिले जाणार आहेत. तसेच एकच पेपर, सर्व विषय, प्रथम सत्राचा अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास – संवाद कौशल्य, मृदू कौशल्य, सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न असून काठीण्य पातळी आणि शैक्षणिक उद्दिष्टानुसार प्रत्येक प्रश्नाला वेगळे गुण, एक तासात जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं चॅलेंज. अमर्याद प्रश्न, बहुदिश विचार करण्यास प्रवृत्त करणारे, ज्ञानाचे उपयोजन, विषयांचा परस्पर संबंध लावून सोडवण्याचे, विचारांची आणि मनाची कवाडे उघडायला लावणारे, मुलांच्या भावविश्वातील प्रसंगांवर आधारित आव्हानात्मक प्रकार, नवनवीन प्रश्न प्रकार, विद्यार्थ्याने सोडविलेल्या प्रश्नांनुसार तिचा/ त्याचा शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्ततेचा विषयवार अहवाल असणार आहे. या स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल आणि शालेय परीक्षेची तयारी होण्यासही मदत होईल.
या परीक्षेसाठी नोंदणीची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर असून नोंदणीसाठी नजीकच्या MS-CIT/KLiC सेंटरशी संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी www.mkcl.org/mom या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन प्रणय तेली यांनी केले आहे.