रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपाचाच ; ना. नारायण राणे यांनी केले स्पष्ट
पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची दिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपचाच आहे. हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे दिली.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघावर शिंदे गट शिवसेना दावा करत असून किरण सामंत लोकसभेसाठी इच्छूक आहेत. याबाबत पत्रकारानी लक्ष वेधले असता नारायण राणे म्हणाले, या मतदार संघात भाजपच आपला उमेदवार देणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तो निवडून आणू व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण लोकसभेला उभे राहणार का या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची, हे पक्ष ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.