गणेश चतुर्थीच्या तोंडावर खावटी कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा !
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा : हरी खोबरेकर यांच्याकडून नाराजी व्यक्त
मालवण : गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ केले जाईल असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्याप ही कर्जे माफ केली नसून ऐन सणासुदीच्या काळात बँका, संस्थांचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या घराकडे जाऊन पैसे भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकातून केली आहे.
शेतकऱ्यांना बँका, सहकारी संस्थांच्या माध्यमातून खावटी कर्जे वितरित करण्यात आली आहेत. मात्र अवकाळी पाऊस अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खावटी कर्जे माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र सरकार गेल्याने याबाबतची कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र राज्यातील शिंदे भाजप सरकारने शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ केली जातील अशी घोषणा केली होती. मात्र याची कार्यवाही शासनाने केली नसल्याचे उघड झाले आहे. सध्या ऐन सणासुदीच्या काळात खावटी कर्जाचे पैसे भरून घेण्यासाठी बँका, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या घरी जात आहेत. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे अशी टीकाही श्री. खोबरेकर यांनी केली आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक रुपया विम्याची रक्कम विमा कंपनीमध्ये भरण्याच्या आश्वासनाचीही पूर्तता या शासनाने केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.