दिव्यांगांच्या आरोग्यासाठी सरपंचांचा पुढाकार ; घरोघरी जाऊन केली आरोग्य तपासणी

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग ; करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांच्या सामाजिक जाणीवेचे होतेय कौतुक

वैभववाडी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांच्या पार्श्वभूमीवर करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी ग्रा. पं. मार्फत गावात “सरपंच दिव्यांगांच्या दारी” उपक्रम राबवला आहे. सरपंच कोलते यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेत गावातील २१ पैकी १६ दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची सरपंच नरेंद्र कोलते यांनी दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. महेंद्रकर यांनी आरोग्य तपासणी करीत दिव्यांग (अपंग) बांधवांसाठी आवश्यक ती औषधे उपलब्ध करून दिली. यावेळी आरोग्यसेवक एस. एस. लोखंडे, सामुदाय आरोग्य अधिकारी ए..एम. चोचे, आरोग्य सेविका एस.एस. चाफे, ग्रा.पं. सदस्य विलास गुरव, रेखा सरफरे, माधवी राऊत, ग्रामसेवक शशिकांत गुरव, जगदिश पांचाळ, जान्हवी पांचाळ, प्रकाश सावंत, उदय कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार तसेच सर्दी, ताप व साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी सरपंच नरेंद्र कोलते यांनी केले. सरपंच श्री. कोलते यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!