आई घुमडाईचा देशात नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न ; उद्योजक दत्ता सामंत यांचे उद्गार
घुमडे येथील श्रावणधारा महोत्सवाचे उद्योजक बाळासाहेब गोसावी यांच्याहस्ते उदघाटन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्री देवी घुमडाई मंदिरात घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उद्योजक दत्ता सामंत यांनी पुरस्कृत केलेल्या श्रावणधारा महोत्सवाचे उदघाटन उद्योजक आनंद उर्फ बाळासाहेब गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. आई घुमडाई देवीचा देशात नावलौकिक व्हावा, यासाठी आम्हा ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु असून आज तब्बल ११ वर्ष ग्रामस्थ निःस्वार्थी भावनेने या श्रावणधारा महोत्सवाच्या माध्यमातून देवीची सेवा करीत असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. तर उदघाटक बाळासाहेब गोसावी यांनी घुमडे गावातील ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले.
घुमडाई देवीच्या मंदिरात दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून १२ सप्टेंबर पर्यंत दर मंगळवारी श्रावणधारा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उदघाटन मंगळवारी सायंकाळी उशिरा घुमडाई मंदिरात उद्योजक बाळासाहेब गोसावी यांच्या हस्ते आणि दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहल बिरमोळे, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, बाळा सामंत, राजा सामंत, धोंडी नाईक, पोलीस उपनिरीक्षक भगवान खोत, प्रशांत बिरमोळे, उमेश बिरमोळे, योगेश सामंत, बाबू बिरमोळे, गणेश बिरमोळे, निलम पांजरी, उमेश परब, बाळू बिरमोळे, अजित बिरमोळे, दत्तू बिरमोळे, संकेत बिरमोळे, आरोग्य सेवक नातेवाड यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांच्याहस्ते बाळासाहेब गोसावी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता सामंत म्हणाले, श्रावणधारा महोत्सवात संयुक्त नाटक, भजन स्पर्धा, जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असून दर मंगळवारी दशावतारी नाटक देखील आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रत्येक ग्रामस्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करीत असून अशी एकी अन्य कुठेही पाहायला मिळणार नाही. या कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन त्यांनी केले.
तर उद्योजक बाळासाहेब गोसावी यांनी घुमडे गाव ही नररत्नांची खाण असल्याचे सांगून गावातील एकी पाहून आपल्याला आनंद झाला. ही एकी अशीच कायम राहो आणि घुमडे गावावर श्रावणधारा अशीच कोसळत राहो, असे ते म्हणाले. प्रास्ताविक राजा सामंत यांनी केले. बाबू बिरमोळे यांनी आभार मानले.