मालवणात भाजपाची नगरपालिका, महावितरणला धडक ; गणेशोत्सवापूर्वी समस्या मार्गी लावण्याची केली मागणी

आवश्यकता भासेल तेथे सहकार्यासाठी भाजपा तयार ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही

… तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला सज्जड इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी सण महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही नगरपालिका, महावितरणच्या स्तरावतील अनेक कामे प्रलंबीत असून ही कामे वेळीच मार्गी न लागल्यास शहरातील नागरिक आणि गणेशभक्तांची तीव्र गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर मालवण शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालिका आणि महावितरणला धडक देत समस्या मार्गी लागण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गणेश चतुर्थी सण सुरु होण्यास अजूनही साधारण महिन्याभराचा अवधी आहे. त्यामुळे सर्व समस्या सुटल्याच पाहिजे, ज्याठिकाणी शासनाकडून मदतीची गरज आहे, तिकडे गरज असल्यास आमची मदत घ्या. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध केली जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिकेला धडक देत अवेक्षक सुधाकर पाटकर, महेश परब आदी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या शिष्टमंडळात शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, आप्पा लुडबे, मोहन वराडकर, आबा हडकर, महेश सारंग, राजू बिडये, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, पूजा वेरलकर, नंदू देसाई, बाबू कासवकर, निनाद बादेकर, राजा मांजरेकर, कमलाकर कोचरेकर, महेश कांबळी, राज कांदळकर, दत्तात्रय केळूसकर आदी उपस्थित होते.

कोकणातील सर्वात मोठा हिंदू सण गणेश चतुर्थी. या गणेश चतुर्थी निमित्त मालवण शहरात सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक नियोजन व शासकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गणेश विसर्जन मार्ग व शहर प्रवेश मार्गावरील झाडी स्वच्छ करणे, गणेश विसर्जनाच्या जागेवर लाईटची सुविधा उपलब्ध करणे, मालवण शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे तरी शहरात डास प्रतिबंधक फवारणी करणे, गणेश विसर्जन स्थानी बराच भाग पावसाने बुळबुळीत झाला आहे. त्या ठिकाणी स्वच्छ करुन ब्लिचिंग पावडर मारणे आवश्यक आहे. शहरातील स्ट्रिट लाईट मोठ्या प्रमाणात बंद आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्यात, शहरातील जवळपास ६० % हायमास्ट टॉवरच्या लाईट बंद आहेत, त्या दुरुस्त कराव्यात, पाणी शुद्धीकरणासाठी पाण्यात टाकावयाचे औषध उपलब्ध करुन द्यावे, शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे, मालवण बंदर जेटी येथे गणपती विसर्जना दिवशी आप्तकालीन व्यवस्थेचे पथक उपलब्ध करुन द्यावे, मालवण शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे व पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या तीन दिवसापासून फळ हातगाड्या, भाजीपाला विक्री व्यवस्था यासाठी झोन करुन व्यवस्थापन करण्यात यावे, मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ असून त्यासाठी मालवण शहरात साथी पासून कशी काळजी घ्यावी यासाठी प्रसिद्धी फलक व अलॉन्सींग करण्यात यावे, रिक्षा प्रवासी वाहतुक नियोजन करण्यात यावे, महाराष्ट्र विद्युत महामंडळ, पोलीस व्यवस्थापन, महसुल एस. टी. व्यवस्थापन यांची संयुक्त सभा लावण्यात यावी, भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात यावे. दरवर्षी यांचे नियोजन आपल्या प्रशासना मार्फत करत आहात. पण गेल्यावर्षी बऱ्याच त्रुटी व्यवस्थापनात राहिल्याने बऱ्याच प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागला, असे निवेदन यावेळी पालिका अधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालिकेनंतर महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शहरात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याबाबत समस्या मांडून शहरातील स्ट्रिट लाईट व विद्युत वाहिन्यांवर आलेल्या वेली व झुडपे तोडून घ्यावीत अन्यथा याठिकाणी शॉक लागण्या सारखी दुर्घटना घडू शकते, याकडे लक्ष वेधून गणेश चतुर्थी कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी, तक्रार निवारणासाठी कक्ष उभा करण्यात येऊन त्याठिकाणी कर्मचारी नेमावा आणि त्या कर्मचाऱ्या मार्फत वीज ग्राहकांशी सौजन्याने वागण्यात यावे, विद्युत तक्रार निवारण्यासाठी अतिरिक्त स्टाफ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गणेश उत्सवाच्या कालावधीत कोणाही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू नये, शहरात काही भागात स्ट्रीट लाईट रात्री १०.३० नंतर सुरु केल्या जातात, त्यामुळे स्ट्रीट लाईट सुरु आणी बंद करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

…. अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : पदाधिकारी आक्रमक

मालवण शहरात अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. बाजारपेठ आणी अन्य भागात कॉम्प्लेक्स उभी राहिली असून त्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर न देता उपलब्ध असलेल्या ट्रान्सफॉर्मर वरूनच वीज पुरवठा केला जात आहे. तरी तत्काळ संबंधिताना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!