आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाली
खडकाच्या आधाराला राहिलेल्या तीन मच्छिमारांना वाचवण्यात स्थानिकांना यश
आचरा : आचरा समुद्रात शनिवारी पहाटे मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमार ही पात घेऊन मासेमारीला गेले होते. या नौकेवरील जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन मच्छिमार पाती बाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले.
आचरा समुद्रात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा पिरावाडी येथील मच्छिमार विदेश नारायण कुमठेकर, आदित्य बापू धुरी, वैभव कुमठेकर हे आपली पूजा पात घेऊन मच्छिमारीसाठी गेले होते. मुणगे तालुका देवगड बाजूने मासेमारी करत असताना अकस्मात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मासेमारीसाठी समुद्रात टाकलेली जाळी होडीच्या इंजिनच्या पंख्याला अडकून इंजिन बंद पडल्याने होडी मुणगे आडबंदर मोबार धाकटे केवूंडले येथील खडकाळ भागात दगडांवर आपटल्याने झालेल्या दुर्घटनेत होडीतील तिघेही बाहेर फेकले गेले. खडकांच्या आधारामुळे सुदैवाने होडीतील तिघेही बचावले. सदर दुर्घटनेची माहिती समुद्रात मच्छिमारी करणारे लियाकत मुजावर यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर, सकलेन मुजावर आदींना फोन करुन सांगितल्यावर आचरा पिरावाडी येथील सकलेन मुजावर, आदिल मुजावर, राजू मुजावर, साहिल मुजावर, मुझफ्फर मुजावर, दिनकर कुबल, बुधाजी पाटील, दर्शन तारी, झहिर मुजावर, रशिक जोशी, हिमांशु पाटील, सचिन सारंग, दिलिप तोडणकर, शंकर गोलतकर, मयूर गोलतकर यासह अन्य मच्छिमारांनी आडबंदर येथे जात खडकात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप आचरा येथे आणले. घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस नाईक परब, जगताप, मनोज पुजारे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस, अनिल करंजे, पाडूरंग वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.