मालवण शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव ; नगरपालिकेने वेळीच लक्ष द्यावा…
जिल्ह्यात आढळणाऱ्या डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मागील आठवड्यात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरात गेले काही महिने बंद असलेली डास प्रतिबंधक औषधांची फवारणी तात्काळ सुरु करावी, अशी मागणी भाजपाचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.
मालवण शहरात गेली अनेक महिने डास प्रतिबंधक फवारणी बंद आहे. त्यामुळे शहरातील सर्वच प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात रोगराई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट असून मुख्याधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच डास प्रतिबंधक फवारणी सुरु करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही शहरात मागील आठवड्यात डेंग्यू सदृश्य रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे. मालवण शहरातही डासांच्या वाढत्या संख्येमुळे अशा प्रकारची रोगराई निर्माण झाल्यास प्रशासनावर अतिरिक्त ताण येणार आहे. त्यामुळे पालिकेमार्फत शहरात तातडीने फवारणी करावी, अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी केली आहे.