सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास शक्य…
आ. नितेश राणेंचा विश्वास ; जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरचे लोकार्पण
देवगड : बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेले नाते विश्वासाचे असले पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आज जिल्हा बँक डीजिटल बँकींग चा पर्याय वापरुन अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देत असून त्याचा परिणाम म्हणून आज या बँकेने ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहीजे, हा दृष्टीकोन जिल्हा बँकेने ठेवला आहे. बँकींग व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. यासाठी डीजिटल बँकींगचा पर्याय अधिकाधिक तत्पर सेवा देण्यासाठी वापरला गेला पाहिजे. आज डोअर स्टेप बँकींगची सेवा देणारी सिंधुदुर्ग बँक ही राज्यातील पहिली बँक असून अल्पबचत प्रतिनिधी मार्फत आजारी, वयोवृध्द ग्राहकांना घरबसल्या बँकींग सुविधा दिल्या जात आहेत, असे ते म्हणाले.
प्रारंभी एटीएमचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. बँकेचे संचालक प्रकाश बोडस यांनी प्रास्ताविक करताना तळेबाजार शाखेच्या व्यवसायाची माहिती दिली व शाखेने कलेली प्रगती म्हणजे ठेवीदार आणि ग्राहकांनी बँकेवर टाकलेला विश्वास असल्याचे सांगून उपस्थितांना बँकेच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवा व बँकींग सुविधांचा लाभ घेत तळेबाजार शाखेकडील आर्थिक व कर्ज व्यवहार, ठेवी वाढविण्यासाठी मोलाची साथ देण्याचे आवाहन उपस्थितांना यावेळी केले. यावेळी बँकेचे खातेदार विश्वास सावंत, बलराम कदम, उत्तम सुतार, नागेश दुखंडे, सतिश तोरसकर या बँकेच्या पाच ग्राहकांना एटीएम कार्ड वितरित करुन शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे, संचालक प्रकाश बोडस, विठ्ठल देसाई, समीर सावंत, वरेरी सरपंच श्रीमती प्रिया गोलतकर, तळवडे सरपंच पंकज दुखंडे, लिंगडाळ सरपंच श्रीमती सायली सावंत, चांदोशी सरपंच दिपाली मेस्त्री, वानिवडे विकास सोसायटीचे चेअरमन गोविंद जयवंत लाड, बापार्डे विकास सोसायटी चे चेअरमन अजित राणे, पुरळ विकास सोसायटी चे चेअरमन रवींद्र तिर्लोटकर, गढी ताम्हाणे विकास सोसायटीचे चेअरमन दिपक धुरी, टेंबवली सरपंच हेमंत राणे, पेंढरी सरपंच मंगेश आरेकर, पोलिस पाटील अनिल लाड, भाई आचरेकर उपस्थित होते. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी तळेबाजार शाखेचे शाखा व्यवस्थापक अजित देवगडकर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तळेबाजार येथील ग्रामस्थ़, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.