स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागल्याने आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त !
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; नारायणराव राणे त्यांच्या भाजपा प्रवेशातील अडचण ठरीत असल्याने भाजपात आलबेल नसल्याचे भासवत असल्याचा आरोप
मालवण | कुणाल मांजरेकर
मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू असून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे स्वतः या कामावर जातीनिशी लक्ष ठेऊन आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी महामार्गाची एक लेन पूर्ण करण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, माजी खा. निलेश राणे आणि आमदार नितेश राणे ही सगळी मंडळी एकमेकाशी संपर्क करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहेत. परंतु आमदार वैभव नाईक याना आता आपल्या भविष्याची चिंता लागली असून सगळे मिळून या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहेत, हा एकसंघ एकोपा पाहून वैभव नाईक यांच्या उरात धडकी भरल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, अशी टीका भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केली आहे.
वैभव नाईक हे ठाकरे गट सोडून भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. पण ना. नारायणराव राणे हे त्यांच्या पक्षप्रवेशातील मोठी अडचण ठरत असल्याने ते भाजप मध्ये आलबेल नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कपोकल्पित उभ्या राहिलेल्या बुरुजाची एक एक वीट दररोज भाजपा नेते निलेश राणे तोडून फोडून टाकत असल्यानेच त्यांच्याकडून असंबंध बडबड सुरु असून यातून कोणीही विचलित होणार नाहीत. उलट अधिक जोमाने शतप्रतिशत भाजप करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे, याची नोंद आमदार वैभव नाईक यांनी घ्यावी, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.