आ. वैभव नाईक यांनी मेलेल्या गुरांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करावेत

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचा खोचक सल्ला ; चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत निलेश राणेंमुळेच

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील चिंदरमध्ये चाऱ्यातून विषबाधा होऊन ६३ पेक्षा जास्त गुरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी येथील शेतकऱ्यांना तत्काळ दोन लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. तसेच २९ जुलै रोजी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेऊन या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची लेखी मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना संबंधित विभागाला केली. याची माहिती मिळताच आ. वैभव नाईक यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने २ ऑगस्टला मंत्री महोदयांच्या कार्यालयात पत्र देण्याची नौटंकी केली आहे. आता निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे चिंदरच्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर वैभव नाईक यांनी याचे श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु करीत मेलेल्या गुरांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असले निवेदनाचे प्रकार खपून जायचे. पण आता भाजपा – शिवसेनेचे सरकार आहे. आणि वैभव नाईक हे विरोधी पक्षातले आमदार आहेत, हे लक्षात घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार त्यांनी थांबबावेत. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिला आहे.

चिंदर मधील गुरे दगावलेल्या शेतकऱ्याना आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली होती. यावरून भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी टोला लगावला आहे. यावेळी युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, दत्तात्रय केळूसकर, कमलाकर कोचरेकर, बबन गावकर, पंकज गावडे, निनाद बादेकर, बापू कुमठेकर, ओंकार लुडबे आदी उपस्थित होते. यावेळी मंदार लुडबे म्हणाले, कुडाळ मालवण विधानसभा भाजपा प्रचार प्रमुख निलेश राणे यांनी चिंदर येथील विषबाधा होउन जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याना मदत मिळावी यासाठी भाजपचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना २९ जुलै रोजी पत्र दिले. त्यावर संबंधित विभागाच्या सचिव यांनी मंत्री महोदयांशी चर्चा करुन मदत देता येते हे ठरल्यानंतर बोलघेवडे आमदार वैभव नाईक यांनी मंत्री ना. विखेपाटील यांच्या कार्यालयात २ जुलैला पत्र दिले. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे श्रेय निलेश राणे आणि भाजपाला मिळण्याच्या भीतीपोटी त्यांनी हे उपद्याप करून आपणच शासकीय मदत देणारे मसीहा असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण आता सत्तेच्या बाहेर आहोत, याचा विसर त्यांना पडला आहे. यापूर्वी ते सत्तेत होते, त्यावेळी ते अशी स्टंटबाजी करायचे आणि त्याना ते पचायचे देखील. पण आता आ. नाईक हे विरोधात असलेल्या एका गटाचे आमदार आहेत. भाजपा नेते निलेश राणे जरी आमदार नसले तरी ते भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीची मंत्री महोदयानी योग्य ती दखल घेउन मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व निलेश राणे यांनी रोख स्वरुपात शेतकऱ्यांना मदत दिली असून शेतीची मशागत करण्याकरीता पॉवरटीलरची मदतही दिली आहे. आता देखील शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी निलेश राणे यांचे शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, असे मंदार लुडबे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!