भरधाव एसटी बसची टाटा पीकअपला धडक ; ११ जण जखमी

मालवण – बेळणे मार्गावरील दुर्घटना : जखमींवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार ; एसटी चालकावर गुन्हा दाखल

मालवण | कुणाल मांजरेकर

कणकवलीहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव एसटी बसने तीव्र उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या टाटा पीकअप गाडीला जोरदार धडक दिल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन बस मधील सात प्रवासी तर टाटा पीकअप गाडीतील चालकासह चार जण असे एकूण ११ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मालवण – बेळणे मार्गावरील आडारी ते खैदा या उताराच्या रस्त्यावर घडला. दरम्यान, या अपघात प्रकरणी हयगयीने वाहन चालवून अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालक संजय रामदास भिलवडकर (वय ४४, रा. सोमवार पेठ मालवण) याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण एसटी आगाराची कणकवली असगणी विरण मार्गे मालवण ही बस कणकवली येथून साडे आठ वाजता मालवणकडे येण्यास निघाली. ही बस खैदा व आडारी दरम्यान उताराच्या व वळणाच्या रस्त्यावरून मालवणच्या दिशेने येत असतानाच ९.४५ वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या मालवण मधील व्यावसायिक अमेय आनंद देसाई यांच्या ताब्यातील टाटा पीकअप (एम एच ०७ पी ०८१७) गाडीला बसने धडक दिली. या धडकेत एसटी बससह टाटा पीकअप गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर बसमधील जयश्री नारायण गावकर, राजदेव मकडू विश्वाकर्मा, बाळकृष्ण नारायण घाडी, लाडोबा बाळकृष्ण परब, नारायण गंगाराम गावकर, आरती आनंद हडकर, सखुबाई सखाराम धुरी या प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. तसेच टाटा पीकअप मधील चालक अमेय देसाई यांच्यासह शशिकांत झिलू लुडबे, हौसराज नीलकंठ पारकर, विकास तुकाजी चव्हाण यांनाही किरकोळ दुखापत झाली. जखमीना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

या अपघाताची माहिती कळताच मालवणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत टाटा पीकअपचे चालक अमेय देसाई यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक संजय रामदास भिलवडकर याच्यावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगयीने भरधाव वेगात वाहन चालवून समोरून येणाऱ्या वाहनास समोरून ठोकर देऊन वाहनाच्या नुकसानीस व प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन अधिनियम कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुशांत पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!