मालवणात १४ ऑगस्ट रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम
मालवण : स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागामार्फत सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन्मान देशभक्ताचा कार्यक्रम या अंतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून आर्मीमध्ये सध्या कार्यरत असणारे सुभेदार मेजर दिनेश गेडाम (चंद्रपूर) यांचा सन्मान करून मुलाखत घेण्यात येणार आहे. तसेच प्रमुख वक्ते म्हणून ॶॅड. समीर गवाणकर यांचे ‘अखंड भारत व देशाची फाळणी’ या विषयावर भाषण होणार आहे. त्यानंतर मशाल फेरीला सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग महाविद्यालय येथून भरड नाका ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते टोपीवाला हायस्कूल -कन्याशाळा मार्गे पुन्हा सिंधुदुर्ग महाविद्यालय अशी ही मशाल फेरी काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांस नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. एम.आर. खोत यांनी केले आहे.