“या” रस्त्याचे तब्बल सात वर्ष डांबरीकरण नाही ; महेश जावकर यांचा आंदोलनाचा इशारा
मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालय समोरील मेढा मार्गावरील पिंपळपार ते साधले तिठा हा रस्ता खड्डेमय बनला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे येथे अपघात घडत असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सुमारे सात वर्ष होऊन गेली तरी या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी हा मार्ग देखील बदललेला आहे. आगामी काळातील सण, उत्सव आणि गणेश चतुर्थीचा विचार करून पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची डागडुजी न केल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी दिला आहे.
या रस्त्याप्रश्नी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन (नगरोत्थान) माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला आहे. शहरातील अनेक रस्ते आमदार वैभव नाईक यांचा पाठपुराव्यातून शासन माध्यमातून यापूर्वी झाले आहेत. यात विकास कामांचे श्रेय घेण्याचे अथवा राजकारण करण्याचा प्रश्न नाही. तांत्रिक बाबींचा विचार करता पावसाळ्यात हा रस्ता होऊ शकत नाही, काही काळ जाईल. मात्र मार्गावरून अधिक प्रमाणात असलेली वाहतूक तसेच आगामी सण उत्सव या सर्वांचा विचार करता मालवण नगरपरिषद प्रशासनाने खड्डेमय रस्त्याची तातडीने योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी. तसेच शहरात ज्या काही मार्गावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याबाबतही लवकर कार्यवाही व्हावी, अशीही भूमिका महेश जावकर यांनी मांडली आहे.