देवबाग रस्त्यावरील वाढीव कंपाउंड व बांधकामे हटवण्यासाठी सरपंचांचा उपोषणाचा इशारा
सा. बां. विभागाने अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार : उल्हास तांडेल
मालवण : देवबाग गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढीव कंपाउंड व बांधकाम यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी सा. बां. विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण- देवबाग हा रहदारीचा मुख्य रस्ता असुन देवबाग गावामध्ये वाहनाच्या रहदारीला होणारे अडथळे तसेच गावातील वाढते पर्यटन त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे देवबागवासियांना प्रवास करते वेळी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ज्याठीकाणी वाढीव जागा मिळेल तेथे वाढीव रस्ता करण्यात यावा, तसेच रस्त्याच्या बाजुला असलेले वाढीव कंपाउंड वाढीव बांधकाम हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे.