ठाकरे गटाचा बुरुज ढासळला ; दांडीतील माजी नगरसेवक भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पंकज सादये यांचा प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण शहरातील दांडी येथे भाजपने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे मावळते नगरसेवक पंकज सादये यांनी गुरुवारी भाजपचे कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मालवण येथील कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. येत्या काही कालावधीत होणाऱ्या मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज सादये यांचा पक्ष प्रवेश ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, भाई मांजरेकर, पंकज पेडणेकर, अवी सामंत, प्रमोद करलकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, चारुशीला आचरेकर, सौ. महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर यांच्यासह माजी नगरसेवक पंकज सादये आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर यांनी विचार मांडताना निलेश राणे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासाच्या कामांची माहिती दिली.

पंकज सादये हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळते नगरसेवक आहेत. मागील पालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मालवण नगरपालिकेचे आरोग्य सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. दांडी प्रभागात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे सादये यांचा भाजपा प्रवेश ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे.

यावेळी निलेश राणे म्हणाले, पंकज सादये आज भाजपात दाखल झाले आहेत. येत्या काळात त्यांच्या मनात शहर विकासाची जी संकल्पना असेल ती पूर्ण केली जाईल. कोणत्याही प्रकारची कमी पडू दिली जाणार नाही. आमची ताकद आज वाढली आहे. येत्या काळात तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करू. दांडी येथे रस्ता कम बंधारा करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. ते काम आम्ही करून देणार. पालकमंत्री यांच्या मार्फत पाठपुरावा सुरु आहे. उद्या न. प., जि. प. निवडणूक आहे. सगळीकडे भाजपामध्ये प्रवेश होत आहेत. बदल घडवण्याची ताकद फक्त भाजपात आहे. नऊ वर्षात आपला मतदार संघ विकासात मागे पडला आहे. हा बॅकलॉग भरण्यासाठी आणखी काही वर्ष कमी पडतील. या मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधीची तफावत आहे. आता आपल्याला भरपूर निधी आणायचा आहे. मालवण शहर आपल्याला पुढे न्यायचे आहे. दांडी भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!