राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सहकाराच्या मंदिरात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळयात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे उदगार
सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर
संस्था ही निरंतर चालत असते. काळानुरुप संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी बदलत असले तरी आपण काम करत असताना आपले काम भविष्य़ातील पिढ्यांसाठी आदर्शवत असले पाहिजे. बदलत्या स्पर्धायुक्त बँकिंग क्षेत्रात काम करत असताना आपणाला एक कुटुंब म्हणून काम करायचे आहे. सहकाराला एक दिशा द्यायची आहे. पारंपारिक बँकिंग व्यवस्थेतून आज सीबीएस सिस्टम मध्ये काम करत असताना बँकेच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच काळानुरूप आपल्य़ा मानसिकतेत बदल केले पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना केले.
केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराच्या या मंदिरात सहकाराला आधुनिकतेची जोड देत दिशा देण्याचे काम आम्ही करीत आहोत, असे सांगून आज माझ्या वाढदिवसनिमित्त सहकारात काम करणाऱ्या अनेक व्यक्तिंनी प्रत्यक्ष भेटून, फोन वरुन व संवादाच्या विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छा मला या पुढील काळात प्रेरणा आणि उर्जा देणाऱ्या आहेत. आपणा सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य मला नेहमीच मिळत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे भावपूर्ण उद्गार मनीष दळवी यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा बुधवारी सिंधुदुर्ग बँकेच्या प्रधान कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने कौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते म्हणाले, आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे, कै. शिवराम भाऊ जाधव, कै. डी. बी. ढोलम या सहकारातील जेष्ठ नेत्यांनी रुजविलेल्या सहकार क्षेत्रामध्ये आज या जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची राणे साहेबांनी दिलेली संधी हे मी माझं भाग्य समजतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, गेल्या वर्षभरामधील प्रगतीचा आढावा घेतला तर या वेगाने ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा येत्या वर्षात आम्ही निश्चित गाठू असा विश्वास त्यानी व्यक्त केला. या अभिष्टचिंतन सोहळ्यात ज्येष्ठ संचालक गजानन गावडे यांनी मनीष दळवी यांच्या नेतृत्वाबाबत बोलतांना त्याच्यातील असलेली उर्जा आणि चिकाटीचे कौतूक केले. तर संचालक प्रकाश मोर्ये यांनी मनीष दळवी लहान वयापासूनच विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करीत असून त्यांची सहकारात काम करण्याची हातोटी, कौशल्य हे वाखाणण्याजोगे आहे, असे मत व्यक्त केले. य़ावेळी बँकेचे लेखाविभागाचे सरव्यवस्थापक दिवाकर देसाई, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. पाटील, कर्मचारी संचालक देवेंद्र धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. या वेळी संचालक विठ्ठल देसाई, विदयाधर परब, श्रीम. प्रज्ञा ढवण, श्रीम. नीता राणे, समीर सावंत, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई, अधिकारी कर्मचारी वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.