सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची पत्रकार परिषदेत माहिती ; वर्ष अखेरीस ६ हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट
ओरोस | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या व्यवसायात ५ हजार कोटींचा टप्पा गाठला असून डिसेंबर अखेरीस ६ हजार कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. बँकेने गाठलेला ५००० कोटी व्यवसायाचा टप्पा व बँकेच्या रविवार दि. ३० जुलै रोजी होत असलेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेच्या ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्ष अखेरील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, CTS, Micro ATM Door Step Banking, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बैंकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने ४ दशकांची वाटचाल पूर्ण केली असून २७ जुलै, २०२३ रोजी बँकेने रू.५००० कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. व्यवसायाचा हा पल्ला गाठण्यामध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांचा मोठा वाटा राहिला आहे. याबद्दल बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी या सर्वांप्रती आभार व्यक्त केलेले आहेत. सदर वर्षामध्ये बँकेस रू.३२०.९८ कोटींच्या नविन ठेवी प्राप्त होवून बँकेच्या एकूण ठेवी रू.२६०२.९२ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. ठेवींच्या वाढीचे प्रमाण ७.३९४ राहिल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडील ठेव वाढीचा वेग विचारात घेता, गतवर्षीच्या ठेव वाढीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर व सातारा जिल्हा बँकांनंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये रू.२०१.०२ कोटींची वाढ होवून एकूण कर्जे रु.२२३५.१७ कोटी एवढी झाली आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रु.३८०.१८ कोटी भरीव वाढ झालेली आहे. बँकेच्या एकूण निधींमध्ये रू.७२.३७ कोटी एवढी वाढ होवून एकूण निधी ३५५.९२ कोटी एवढे झालेले आहेत. चालू वर्षी बँकेस ढोबळ नफा रु.९०.७२ कोटी एवढा झालेला असून आवश्यक सर्व तरतूदी केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा रु.२०.२१ कोटी एवढा आहे. चालू वर्षी बँकेच्या ढोबळ एनपीएच्या प्रमाणामध्ये १.१७% एवढी घट झाली असून बँकेच्या ढोबळ एनपीए चे प्रमाण ३.५६४ तर निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.००% आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १०.८३४ एवढे असून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमितपणे करून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरिक्षणामध्ये ‘अ’ ऑडिट वर्ग मिळालेला आहे.
मागील ४० वर्षांच्या वाटचालीमध्ये बँकेने जिल्हयातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बैंकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आधुनिक बैंकिंगचा वेळोवेळी अंगिकार करून ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने आधुनिक बैंकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामुळेच मागील १८ महिन्यात रू.१०११ कोटींच्या व्यवसाय वाढीसह मोठे उद्दिष्ट बँकेने गाठले आहे. यामुळे मागील बऱ्याच कालावधीपासून ठरविलेले रू.५००० कोटींचे व्यवसाय गाठण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास आले असून कोकणातील अग्रगण्य बँक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुढे आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या वाटचालीत हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे आज सर्व जिल्हा वासियांचे अभिनंदन करण्यात येत आहे. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्ष अखेरीस रू.६००० कोटी व्यवसायाचा टप्पा गाठण्याचा बँकेचा संकल्प असल्याचे नमूद करून, बँक जिल्हा वासियांना उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. तसेच यासाठी बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांकडून आवश्यक सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या दि. ३० जुलै २०२३ रोजी होत असलेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासद संस्था प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.