मालवण बंदर जेटी वरील वाहनतळाचे काम पूर्णत्वास ; व्यापाऱ्यांतून समाधान

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सुचवलेल्या त्रुटींची पूर्तता

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने येथील बंदर जेटीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वाहन तळाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या कामाच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी व्यापाऱ्यांसह भेट देऊन काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता झाली आहे. यात प्रामुख्याने बाजारास येणाऱ्या व्यापाऱ्यांना, मालवाहकांना त्यांच्या गाड्या उभारण्यासाठी पंधरा फुटाची वाट ठेवल्याने व्यापाऱ्यांना भेडसावणारी समस्या दूर झाली आहे. हे काम मार्गी लागल्याने महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनी मालवण वासियांच्या वतीने मेरिटाईम बोर्डाचे आभार मानले आहेत.

बंदर धक्का येथे मेरिटाईम बोर्डाच्यावतीने वाहनतळ तसेच काँक्रीट भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करत असताना वाहनतळाकडून बाजारपेठ येथे जाण्यासाठी लहान वाट ठेवण्यात येणार होती. यामुळे बाजारपेठ येथे गाड्या घेऊन येणारे, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाच्या सामानाचे मालवाहक ट्रक यांना याठिकाणी येणे अशक्य होणार होते. त्याचबरोबर या वाहनतळाच्या मधून बाजारपेठ याठिकाणाहून येणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठ येथील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत होता. ही मोरी सुद्धा बदलून अन्य ठिकाणी नेण्यात येत होती. याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी व्यापारी संघाच्या पदाधिकारी, अन्य व्यवसायिकांसह येथील बंदर कार्यालयात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. बाजारपेठ येथे जाण्यासाठी १५ फुटाची वाट ठेवण्याबाबत तसेच पाणी निचरा होण्यासाठी पूर्वीपासून असलेली वाट कायम ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यानंतर या सूचनेची तात्काळ दखल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि व्यापारी, व्यवसायिकांनी केलेल्या सूचनेनुसार १५ फुटाची वाट आणि पूर्वीच्या ठिकाणी असलेली मोरीचे बांधकाम त्याचठिकाणी करून दिले. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून तसेच मालवण वासीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हे काम मार्गी लावल्याबद्दल मालवण वासियांच्यावतीने माजी नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर, श्री. खोत यांनी मेरिटाईम बोर्डाचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!