आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !

पावशी येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ८ मागण्या सोडवण्यासाठी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक

राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने ना. राणेंचा कृतज्ञतापूर्वक सत्कार

कुडाळ | कुणाल मांजरेकर

कोरोना काळामध्ये आरोग्य सेवकांनी रुग्णांना दिलेली सेवा मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे तुम्हाला केवळ आश्वासन देणार नाही, तर तुमच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पावशी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात दिली. अनुभवी कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ४०% आरक्षण, नव्या व अनुभवी कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची रजा, ईपीएफ अशा विविध मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या. याबाबत संबंधित मंत्र्यांशी संपर्क करण्याचे आश्वासन देतानाच अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे राणेंनी सांगितले. दरम्यान, राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याबद्दल यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पावशी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. संदेश कांबळे, डॉ. सई धुरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, स्वप्नील गोसावी, संदीप देसाई, अजित सावंत, स्वप्नील झोरे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जी सेवा केली ती कौतुकास्पद होती. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी माझे आहेत, मी माझ्या पदाचा वापर करून माझ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वासही नारायण राणे यांनी दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित बालकांचा प्रश्न गहन आहे. हा कुपोषणाचा प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे असून सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करा, या समस्येकडे लक्ष द्या, अशी सूचना सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढत असून विकासाच्या बाजूने राहिला तर सिंधुदुर्ग जिल्हा येत्या काळात देशात अव्वल बनेल, असा विश्वास व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत अव्वल असून अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले करिअर घडवत आहेत. त्यामुळे विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने कोणतीही मदत करण्यास आपण तत्पर असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकावेळी अजित सावंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे येथे उपस्थित झाल्याने आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. आजचा दिवस हा क्रांतीचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्ही अशा व्यक्त करतो. ५९७ आरोग्यसेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे प्रयत्न राहिले असेही ते म्हणाले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन स्वप्निल झोरे तर उपस्थितांचे आभार दयानंद कांबळे यांनी केले. या मेळाव्यास सिंधुदुर्ग तसेच अन्य जिल्ह्यातून आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!