चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून “सायनाईड” विषबाधा ?
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त
आ. वैभव नाईक यांच्या समावेत घेतलेल्या बैठकीत पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांची माहिती
पुणे येथील रोग तपासणी विभागाची टीम चिंदर गावात गुरांच्या तपासणीसाठी येणार
मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने गुरे दगावण्याचे प्रमाण सुरूच असून आमदार वैभव नाईक यांनी मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधत गुरांच्या साथ रोगावर उपायोजना करण्याची सूचना केली होती. बुधवारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दाखल होत आ. वैभव नाईक यांच्यासमवेत कणकवली येथे त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. वैभव नाईक यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. मृत गुरांचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अहवाल आला असल्याची माहिती डॉ. प्रशांत कांबळे यांनी यांनी दिली.
डॉ. वाय. वाय.पठाण यांच्या नेतृत्वाखाली रोग तपासणी विभाग पुणे येथील टीम चिंदर गावात गुरांच्या तपासणीसाठी येणार असल्याचे डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले.हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी आवश्यक सर्व उपायोजना करा अशा सूचना आ. वैभव नाईक यांनी बैठकीत दिल्या. चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाली असल्याने त्यावर उपायोजना म्हणून चिंदर गावातील सर्व गुरांवर लसीकरण करण्यात येत आहे. हा रोग आजूबाजूच्या गावात पसरू नये यासाठी काळजी घेतली जात असल्याचे डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग जि. प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जि. प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, कणकवली पशुधन विकास अधिकारी डॉ.स्वप्नील अंबी,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, हरकूळ सरपंच बंडू ठाकूर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.