मालवणचं वीज वितरण कार्यालय “बेवारस” ; काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवेदन भिंतीवर “चिकटवून” केला निषेध !
वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त ; पावसाळी अधिवेशना दरम्यान काँग्रेस मालवण कार्यालयावर आणणार मोर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
वीज वितरण कंपनीने राज्यातील विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे वीज ग्राहक मेटाकुटीला आले असून हे वाढीव विजेचे दर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वीज वितरणचे मालवण कार्यालय गाठले. मात्र यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. अखेर कार्यालयातील भिंतीला निवेदन चिकटवून काँग्रेसने याचा निषेध केला. वाढीव वीज बिलांच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या वेळी वीज वितरणच्या मालवण कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशारा प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मालवण येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वीज वितरणच्या देऊळवाडा येथील कार्यालयाला धडक दिली. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस आदी उपस्थित होते. यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता उपकार्यकारी अभियंता साखरे यांची बदली झाली असून त्याठिकाणी दुसरा अधिकारी हजर झालेला नाही. तर प्रभारी अधिकारी म्हणून पदभार असलेल्या सहाय्यक अभियंता सोनाली गिरकर ह्या देखील आज सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणीही अधिकारी नसेल तर वीज ग्राहक आणि नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी भेटायचे कोणाला ? असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी होता. अखेर कोणीही अधिकारी उपलब्ध नसल्याने आपल्या मागण्यांचे निवेदन वीज कार्यालयाच्या भिंतीला चिकटवण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, या महिन्यात आलेली लाईट बिल ही दुप्पट ते तिप्पट रकमेची आहेत. एप्रिल महिन्यात असलेला युनिट दर व या महिन्यात आलेल्या बिला मधील युनिट दर हा वाढीव असल्याचं दिसून आलं आहे. जवळ जवळ ३ ते ४ रुपयापर्यंत युनिटचा दर वाढवला गेला असून यामुळे अनेक नागरिकांना काही हजारामध्ये भुदंड सोसावा लागत आहे. काहीश्या शेकड्यात येणारी बिले आता हजारात येऊ लागली आहेत. युनिट मागील वाढलेला हा दर इतर राज्यांच्या मनाने आपल्या राज्यात भरपूर प्रमाणात आहे. राज्य सरकारने हा वीजदर वाढवताना स्थानिक वृत्तपत्र अथवा कार्यालयात बोर्ड लावून नागरिकांना पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. परंतु तसे न करता महिन्यात ही बिल आल्याने आता ऐन पावसाळ्यात मजुरीची कामे देखील नसतात व व्यवसाय ही ठप्प असल्याने इतकी रक्कम कुठून भरणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यात आता बिल हे हजारात थकीत दिसणार असुन ते मुदतीत न भरलं गेल्यास आपल्या कर्मचारी वर्गाकडून मीटर कट करण्यात येत आहेत आणि मुदतीनंतर जरी बिल भरलं तरी ते आपल्या साईटवर ऑनलाईन दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार आपल्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. हा नाहक त्रास नागरिकांना होत असून तांत्रिक बाबी पाहता वीज वितरण कंपनी नागरिकांना योग्य सुविधा देत नाही. तरी याची तात्काळ दखल घेऊन युनिट दरही कमी करून नागरिकांना सहकार्य करावं. अन्यथा येत्या काही दिवसात आपल्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.