सावधान… गडनदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने होतेय वाढ ; जिल्हा प्रशासन “अलर्ट” मोडवर… !

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा ; आवश्यकता वाटल्यास स्थलांतरण करण्याच्या सूचना

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील गडनदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गडनदीची इशारा पातळी ३६.७६४ मीटर इतकी असून सदर नदीची धोका पातळी ३७.१२० मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत सदर नदीची पाणी पातळी ३५.०० मीटर इतकी झालेली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने ७ जुलै रोजी जिल्ह्यासाठी अरिंज आनर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे गड नदीच्या पुरप्रवण क्षेत्रात येणा-या मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे, चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या गावातील नागरिकाना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आवश्यकता वाटल्यास नदी काठच्या लोकांचे स्थलांतरण करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार गड नदीच्या पूरबाधित क्षेत्रात मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरखडे, जानवली, फणसनगर या गावातील ग्रामस्थांना सदर बाबीची आपल्या यंत्रणेमार्फत माहिती देण्यात यावी. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये-जा करू नये, नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणा-या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी, मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे, चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या ग्रामपंचायतीनी सखल भागात राहणाऱ्या तसेच घरात राहणाऱ्या व्यक्तीबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आवश्यकतेनुसार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे. त्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी सुरक्षित निवा-याकरिता शाळांची निवड करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्थ यंत्रणांना द्याव्यात. नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलावर पाणी आल्यास अशा पुलावरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. विशेषतः पूरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होडयांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे. पुराच्या पाण्याने झाडे उन्मळून पडल्यास ती बाजूला घेण्यासाठी आवश्यक कटर उपलब्ध करून ठेवावेत. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!