रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही लाईन होणार भूमिगत ; आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा
सिंधुरत्न योजनेमधून २० लाखांचा निधी मंजूर ; बाबी जोगी यांची माहिती
मालवण : वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे मालवण शहराला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शहरातील रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही विद्युत लाईन भूमिगत करण्यासाठी सिंधुरत्न योजनेमधून २० लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. हे काम मार्गी लागल्यानंतर आता वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या मार्गी लागणार आहे. लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, माजी नगरसेविका शीला गिरकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, पॉली गिरकर यांनी सदर ११ केव्ही लाईन भूमिगत करण्याची मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या कामाला निधी मंजुर केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.