१ जुलैच्या मोर्चावेळी “त्यांच्या” जीविताला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या !
भाजपा आमदार नितेश राणे यांची ट्विटर वरून मुंबई महापालिकेला सूचना
कुणाल मांजरेकर
मुंबई महापालिकेच्या कारभारा विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे आ. राणे यांनी या ट्विटला मुंबई महापालिकेला मेन्शन करून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे.
या ट्विट मध्ये आ. नितेश राणे म्हणतात, ” प्रत्येक प्राणीप्रेमी मुंबईकरांच्या अगदी जवळचा असा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. १ जुलैला मुंबईत पेंग्विनचा मोर्चा निघणार असल्याच्या बातम्या मी पाहत होतो. आपल्या सर्वांना माहित आहे की पेंग्विन केवळ अत्यंत थंड हवामानात आणि विशेष हवामान परिस्थितीत अस्तित्वात असू शकतात. त्यादिवशी मुंबईच्या रस्त्यावर अनेक पेंग्विन येणार असल्याने मला त्यांच्या तब्येतीची फार काळजी वाटते. मुंबईचे हवामान त्यांच्यासाठी योग्य असेल की नाही हे मला माहीत नाही. मुंबईतील दमट वातावरणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की त्यांना एकतर एअर कंडिशनर किंवा कुलर उपलब्ध करून द्यावे किंवा त्यांना योग्य सुविधा द्या. जेणेकरून त्यांच्या जीवितास कोणतीही हानी होणार नाही. मला आशा आहे की तुम्ही या गंभीर विषयाकडे खरोखर लक्ष द्याल” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.