तोक्ते वादळात वैभव नाईकांनी वाटलेली मदत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातील !

आ. नाईकांनी जनतेसमोर वस्तुस्थितीचा खुलासा करावा ; शिवसेना क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांची मागणी

मालवण नगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांकडून सव्वा दोन कोटींचा निधी : तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती

सागरी महामार्ग आणि सी वर्ल्ड दोन्ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु : तालुकाप्रमुख महेश राणे

मालवण | कुणाल मांजरेकर

तौक्ते वादळात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेली मदत ही तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पुढाकारातून उपलब्ध झालेली होती. वादळात नुकसानग्रस्तांना मदत करण्याची शिकवण ही शिवसेनेचीच आहे. मात्र, याचा राजकारणासाठी आम्ही कधीही फायदा उठविला नाही. त्यामुळे याचे कोणीही राजकारण करू नये, अशी आमची माफक इच्छा आहे. एकनाथ शिंदेकडून मदत आणून आमदार वैभव नाईक यांच्याकडून करण्यात येत असलेला ‘स्वत: मदत दिली’ हा प्रचार चुकीचा असून याचे खरे उत्तर आमदार वैभव नाईक यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी केली आहे.

मालवण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बबन शिंदे बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, अरुण तोडणकर, उपशहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख अल्पेश निकम, शबनम शेख, महिला विभागप्रमुख मयुरी घाडीगावकर, मारुती थोरवंशी, संतोष परब आदी उपस्थित होते. मालवण तालुक्यात शाळांमध्ये शिक्षक नसल्याने शाळा बंद होणार असल्याचे सांगत आमदार वैभव नाईक यांनी पंचायत समितीच्या आवारात नौटंकी करून आंदोलन केले. तालुक्यात एकही शाळा शिक्षक नसल्याने बंद राहिलेली नाही. यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात आलेले होते. याची माहिती न घेताच आमदारांनी आंदोलन करून आपले अज्ञान प्रकट केलेले आहे. जर आमदारांना खरोखरच तालुक्यातील शासकीय शाळांबद्दल तळमळ होती, तर मग महाविकास आघाडी शासनाच्या अडीच वर्षात किती शिक्षक त्यांनी शाळांसाठी उपलब्ध करून आणले ? शाळांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात? हेही जाहीर करावे, असाही टोला शिंदे यांनी मारला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी योग्यच नियोजन केलेले असून भविष्यात शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांचा प्रयत्न आहे. सरकार बदलल्यानंतर आता आमदार शिक्षक नसल्याची बोंब मारत आहेत, मग अडीच वर्षे सरकार असताना गप्प का होते? असाही सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांच्या टिकेला विकास कामाने उत्तर देणार

शासन आपल्या दारी कार्यक्रम सिंधुदुर्गात घेऊन अनेकांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. हजारो ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती मिळालेली आहे. एकाच छताखाली शासकीय योजना मिळाल्याने अनेकांनी त्याचा फायदा घेतला आहे. यामुळे आता शासनाच्या योजनांची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बुथप्रमुख व शिवदूत यांच्यावतीने काम उभे केले जाणार आहे. विरोधक सध्या शासनावर आणि मंत्र्यांवर टिका करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र आम्ही टिकेला विकासकामे करून उत्तर देणार आहोत, असेही शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी कार्यक्रम हा दिशादर्शक आणि तरुणांना उभारी आणणाराच आहे. यामुळे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन आणि आम्ही आभार मानत आहोत, असेही शिंदे म्हणाले.

नगरपालिकेसाठी सव्वा दोन कोटी रूपयांचा निधी – राजा गावकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण नगरपालिकेसाठी नगरोत्थान योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरातील रखडलेली विकासकामे आणि नवीन विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी शहरासाठी आवश्यक असणारा निधी १०० टक्के उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केले. कोळंब ते आडारी आणि देऊळवाडा आडवण अशा नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. तसेच शहरातील रखडलेली भुयारी गटार योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनस्तरावरून खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांचीही भेट घेण्यात येणार असल्याचेही गावकर यांनी स्पष्ट केले.

सागरी महामार्ग आणि सी वर्ल्डसाठी आग्रही – महेश राणे

सागरी महामार्ग आणि सी वर्ल्ड हे दोन्ही कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही असून मुख्यमंत्री यांच्याकडे तशाप्रकारे पाठपुरावा सुरू आहे. सी वर्ल्डमुळे हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार असून पर्यटनाला नवीन दिशा मिळणार आहे. तर सागरी महामार्ग मालवण, देवगड, वेंगुर्ले याचबरोबर इतरही तालुक्यांच्या विकासासाठी महत्वाचा मार्ग ठरणार आहे. सागरी महामार्गाची नोंद राजपत्रात झालेली असून लवकरच यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यामुळे पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे, असे तालुकाप्रमुख महेश राणे यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!