तुमच्या नेत्याना २५ वर्षात जमले नाही, तेवढे काम आ. वैभव नाईकांनी ९ वर्षात केले…

ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचे भाजपच्या विजय केनवडेकर यांना प्रत्युत्तर

सुदेश आचरेकरांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्ने जरूर पहावीत, पण आ. नाईकांवर टीका करू नये

मालवण | कुणाल मांजरेकर

आमदार वैभव नाईक यांनी ९ वर्षात जेवढे काम केले, ते विजय केनवडेकर यांच्या नेत्यांना २५ वर्षात जमले नाही. तोक्ते वादळात मालवणात जेवढा मदत निधी आला, तेवढा निधी आजपर्यंत कधीही आला नव्हता. वादळाची स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आ. नाईक हे स्वतः आठ दिवस मालवणात ठाण मांडून होते. त्यावेळी तुमचे नेते कुठे होते ? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी उपस्थित केला आहे. सुदेश आचरेकर यांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्ने जरुर पहावीत, पण आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करू नये. आ. नाईक यांनी दोनवेळा विजय मिळवला तो जनतेचा कौल होता. तसेच सुदेश आचरेकर यांच्या मेढा राजकोट मध्ये बंधारा कम रस्ता वैभव नाईक यांनीच मंजूर करून आणलाय हे विसरू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे शहरप्रभारी विजय केनवडेकर यांनी आ. वैभव नाईक आणी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर केलेल्या टिकेचा बाबी जोगी यांनी समाचार घेतला आहे. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या जनतेचे पंचनामे करून घेण्यात आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते दबाव आणत होते असं तुमचं म्हणणं असेल तर आमच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी किती निधी आणून दाखवला हे तुम्ही पाहिलंत आहात आजपर्यंत एवढा निधी कुठच्याही वादळात लोकांना मिळालेला नाही. तो तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून पंचनामे केलेत म्हणजेच हा निधी शिवसेनेमुळे व आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच मिळाला हे तुम्ही अप्रत्यक्ष मान्य केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आमदार वैभव नाईक मालवणची वादळानंतरची परिस्थिती पूर्ण पदावर येईपर्यंत मालवण मध्ये आठ दिवस ठाम मांडून होते हे सुद्धा जनतेने पाहिले आहे. तसेच तुमचे नेते त्यावेळी कुठे होते हे सुद्धा जनतेला माहित आहे. केनवडेकर तुम्ही आमच्या खासदार, आमदार यांची चिंता अजिबात करू नका. कोण कोणाच्या पायाखालची वाळू सरकवतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच दाखवून देईल. त्यामुळे तुम्ही ज्या वाळू विषयात लक्ष घालता तोच वाळू विषय सांभाळा हा माझा मित्रत्वाचा सल्ला, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

कोविड काळात तुमच्या नेत्यांच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांवर फुकट उपचार झाले व कोणत्या कार्यकर्त्याचं निधन झालं, त्यावेळी त्याची बॉडी पैसे भरल्याशिवाय देत नव्हते. हे तुम्हाला ठाऊक आहे. हा पूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे कोविड काळात कोणी कोणाला सहकार्य केले, हे जनतेला माहित आहे, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

सुदेश आचरेकर यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना आमदार वैभव नाईक यांनी कोविड काळात चालू केलेले मालवणातील कोविड सेंटर ते कदाचित विसरले असतील. त्या कोविड सेंटर मध्ये किती लोकांचे प्राण वाचले व पैसा वाचला त्याचबरोबर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या सुद्धा लोकांनी पाहिल्या आहेत. त्यामुळे सुदेश आचरेकर यांनी नगराध्यक्ष तिकिटाची स्वप्न जरूर पहावीत. पण आमदारावरती टीका करू नये. नाईक साहेबांनी दोन वेळा विजय मिळवलेला आहे तो जनतेचा कौल होता हे आचरेकरांनी विसरू नये. त्याचबरोबर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर किती गावचे नेतृत्व करतात आणि तुम्ही किती गावचे नेतृत्व करता ते एकदा तपासून पहा. राहिला विषय बंधाऱ्याचा, तुमच्या प्रभागातील मेढा बंधारा कम रोड हा वैभव नाईक यांनीच मंजूर केलेला आहे हे विसरू नका. स्वतःची पाठ थोपटण्यासाठी काहीही बोलू नका, असे श्री. जोगी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!