देवबागसह वायरी भूतनाथ, तारकर्ली गावातील वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी दत्ता सामंत आक्रमक …
त्रुटी दूर न केल्यास शेकडो ग्रामस्थांसह स्वतः उपोषणाला बसणार ; वीज वितरणला आवश्यक तिथे सहकार्य करण्याचाही शब्द
ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे चुकीच्या पद्धतीने ; पैसे भरूनही सेवा मिळणार नसेल तर ग्रामस्थ आक्रमक होणार नाही तर काय ?
मालवण | कुणाल मांजरेकर
देवबागसह वायरी भूतनाथ आणि तारकर्ली गावातील कमी दाबाचा वीज पुरवठा हा प्रश्न गेली अनेक वर्षे कायम आहे. याच विषयामुळे सातत्याने येथील ग्रामस्थ आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. या वादाचे मूळ असलेला येथील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी बुधवारी आक्रमक पावित्रा घेतला. वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता गणेश साखरे यांची भेट घेऊन देवबाग सह तिन्ही गावातील विजेच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तिन्ही गावातील ग्रामस्थांना घेऊन आपण स्वतः वीज वितरण कार्यालया बाहेर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा दत्ता सामंत यांनी दिला आहे. दरम्यान, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या माध्यमातून आवश्यक ती संपूर्ण मदत देण्याची ग्वाही देखील दत्ता सामंत यांनी श्री. साखरे यांना दिली आहे. या संदर्भात त्यांनी वीज वितरणच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करीत या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
देवबाग सह वायरी भूतनाथ आणि तारकर्ली गावातील विजेचा प्रश्न सातत्याने येथील ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरत आहे. काल याच विषयावरून देवबाग ग्रामस्थ आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यामध्ये वाद निर्माण होऊन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते दत्ता सामंत यांनी देवबाग सह परिसरातील विजेच्या समस्या मांडण्यासाठी वीज कार्यालयात उप कार्यकारी अभियंता गणेश साखरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, भाई मांजरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, महेश सारंग, निनाद बादेकर, देवबाग ग्रा. पं. सदस्य छोटु बांदेकर, स्वरा तांडेल, माजी पं .स. सदस्या मधुरा चोपडेकर, बाबली चोपडेकर, जँक्सन राँड्रिक्स, नादार फर्नाडिस, मकरंद चोपडेकर, बाबु कासवकर, गणेश मोडकर, नाना तांडेल, दाजी कुमठेकर, विली फर्नाडीस, पंकज पराडकर, विलास बिलये, अण्णा राऊळ आदी उपस्थित होते. देवबाग गावात मोठ्या प्रमाणात विजेची मागणी आहे. येथे ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे भरून देखील वीज वितरण कंपनी कडून येथे मुबलक वीज मिळत नाही. कमी दाबाच्या विजेमुळे येथील ग्रामस्थांची विद्युत उपकरणे जळून नुकसान होत आहे. मात्र याकडे वीज वितरणचे दुर्लश होत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत, वीज वितरण कंपनी येथे व्यवसाय करते. मग ग्राहकांना सेवा देणे तुमचे काम आहे. त्यामुळे येथील विजेची समस्या मिटली पाहिजे, अन्यथा मी स्वतः ग्रामस्थांना घेऊन वीज कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेन, असा इशारा दत्ता सामंत यांनी दिला. यावेळी देवबाग मधील विज वितरणच्या महिला अधिकाऱ्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असून या महिला अधिकाऱ्याची येथून बदली करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
बड्या हॉटेल व्यावसायिकांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर द्या…
यावेळी देवबाग मध्ये अस्तित्वात असलेल्या ७ ट्रान्सफॉर्मर वरून ज्यादा लोड उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. देवबाग मध्ये काही बाहेरच्या व्यावसायिकांनी येऊन मोठी हॉटेल उभारली आहेत. त्यांना येथील ट्रान्सफॉर्मर वरून विजेचे कनेक्शन देऊ नये, त्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्याची सुचना करावी, असे ग्रामस्थांनी सुचवले असता श्री. साखरे यांनी त्याला सहमती दर्शवली. तसेच देवबाग, तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावाचा स्वतंत्र व्हाट्स अप ग्रुप करण्यात येईल. त्यावर गावातील विजेच्या समस्या मांडाव्यात असे साखरे म्हणाले..
देवबाग ग्रामस्थांवर दाखल गुन्हे चुकीच्या पद्धतीने
देवबाग ग्रामस्थांनी काल वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पैसे भरून देखील ग्राहकांना सेवा मिळत नसेल तर ग्रामस्थ संतप्त होणार नाही तर काय ? असा सवाल दत्ता सामंत पोलीस निरीक्षक विजय यादव यांना केला.