मोदी@9 अभियानाअंतर्गत सिंधुदुर्गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
मागील नऊ वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र व राज्य सरकार यांनी ज्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणुन यशस्वीपणे राबविले. त्याची माहिती सर्व तळागाळातील जनतेपर्यंत देण्याकरीता मोदी @9 हे अभियान सर्वत्र राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेतूनही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे मोदी@9 अभियानाअंतर्गत संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न झाले. यानंतर अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते. यावेळी काळसेकर यांनी सांगितले की, मोदी@9 या अभियानाअंतर्गत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण उपक्रम राबविला जात असून पंतप्रधान मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालावधीत लोक कल्याणकारी योजना, उपक्रम केंद्र व राज्य सरकारने यशस्वीरित्या राबविल्या. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च, डिजिटल क्रांती, रेल्वे, महामार्ग, जलमार्ग विकसित करणे, विमानतळे निर्मिती, नॅनो युरिया खत जगातील पहिला प्रकल्प, जनऔषधी, जलजीवन मिशन, उज्वला गॅस, वंदे भारत एक्सप्रेस, अयोध्या मंदिर अशा व इतर योजना, उपक्रम आहेत. त्याची सर्व माहिती तळागाळातील जनतेपर्यंत जावी या करीता भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेवून उत्स्फूर्तपणे जनतेशी थेट संवाद साधत आहेत.
जिल्ह्यातही महामार्ग चौपदरीकरण सर्व घाट रस्ते दुपदरीकरण, विमानतळ, टेलिमेडीसिनद्वारे पंचक्रोशी स्तरापर्यंत आरोग्य व्यवस्था, धार्मिक स्थळे सुशोभिकरण, कोकण रेल्वे स्थानके सुशोभिकरण, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय उपलब्धी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे निर्मिती, हस्त कला, उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री मातृ वंदना, गरीब कल्याण योजना, आवास योजना, फळ पीक विमा योजना, किसान योजना, आयुष्यमान भारत योजना, जलजीवन योजना, मत्स्यसंपदा योजना, हळद क्रांती, दुग्धक्रांती, विविध पेन्शन, विमा योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्याचा विकास जलदगतीने होत आहे. तर काजू बोंडपासून इथेनाॅल निर्मिती प्रकल्प तसेच इतर प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये कोट्यवधीचा निधी देण्यात आला असून लाखो लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. मोदींना मानणारी २० टक्के वोट बँक आहे, तीही याद्वारे भाजपात आणायची आहे. प्रतिष्ठित व्यक्तिशीही थेट संवाद साधला जात आहे. अभियानाअंतर्गत लवकरच जिल्ह्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे असे काळसेकर यांनी सांगितले.